ड्रंक अँड ड्राइव्ह मध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकावर गुन्हा

नाशिक(प्रतिनिधी) : रात्रीच्या वेळी दारू पिऊन सरकारी वाहन चालवत असताना एका लहान मुलीस धडक दिल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. २८) रात्री मनमाड परिसरात ही घटना घडली. अपघातात दुचाकीस्वारासह मुलगी जखमी झाली आहे. अपघातानंतर निरीक्षकाने समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ व धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिका-याने असा अपघात केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
फिर्यादीनुसार, मद्यधुंद अवस्थेत सरकारी वाहन चालवत घरी जात असताना येथील रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक संदीपकुमार सुदेशसिंग देशवाला यांनी आययूडीपी भागात एका दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकी चालक आणि सात वर्षीय मुलगी रस्त्यावर कोसळले. याप्रकरणी जाब विचारला असता देसवाल यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे अमोल दंडगव्हाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी संशयिताविरुद्ध ड्रक अँड ड्राइव्हसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येथील आययूडीपी भागात राहणारे अमोल दंडगव्हाळ हे त्यांच्या घरासमोर मोटरसायकल (क्र. एमएच ४१ एस ३२४५) वर आपल्या सात वर्षाच्या मुलीसोबत बसलेले होते. याचवेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक संदीपकुमार देशवाला हे सरकारी वाहन (क्र. एमएच ४१ एएस ७८६१) घेऊन पाठीमागून येऊन दुचाकीला धडकले. या धडकेत दुचाकीचालक आणि सात वर्षीय मुलगी खाली पडली. यावेळी देसवाल हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. देसवाल यांनी कारची काच खाली करून दंडगव्हाळ यांना शिवीगाळ केली. आरडाओरड झाल्याने नागरिकांची गर्दी झाली असता देसवाल यांनी त्यांनाही शिवीगाळ केली. स्थानिकांनी देशवाला यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचेही न ऐकता देशवाला यांनी ‘मी कोण आहे, माझी पोस्ट काय आहे, माहित आहे का,’ असे म्हणत शिवीगाळ केली. यानंतर दंडगव्हाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार कथन केला. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!