नाशिक (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दि. २९ जुलैपर्यंत शहरासह परिसरातील महिलांनी भरलेले ३८ हजार ७६१ इतके अर्ज महापालिकेच्या ३९ केंद्रांवर जमा करण्यात आले असून, जमा होणा-या अर्जांची छाननी करण्यासाठी मनपा प्रशासन वॉर्डनिहाय समित्या स्थापण करणार आहे.
नाशिक महापालिका हद्दीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांनी भरलेले अर्ज लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी संकलित केलेले अर्ज महापालिकेच्या सहा विभागांतील ३९ केंद्रांवर जमा करण्यात येत आहेत. मनपाकडून संबंधित ३९ केंद्रे अधिकृतरीत्या सुरू करण्यात आल्याने या योजनेच्या केंद्रांवरच अर्ज जमा करण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. जमा होणा-या अर्जांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाकडून छाननी समित्या गठीत करून त्याद्वारे अर्जांची तपासणी करून पात्र अर्जांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात येणार आहेत. २९ जुलैपर्यंत ३८७६१ महिलांचे अर्ज या केंद्रांवर दाखल करून घेण्यात आले आहेत. शहरातील महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी मनपाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मदत केंद्रांवर अर्ज दाखल करण्याचे आवाहन मनपाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.