नाशिक (प्रतिनिधी): जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी आज गुरुवार (दि.१) कामकाजाच्या वेळी काळ्या फिती लावून निषेध नोंदविणार आहेत. तसेच, दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती कार्यालयांसमोर एक तास धरणे देऊन निदर्शने करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे देण्यात आली.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारी, जिल्हा परिषद निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचारी राज्य समन्वय समितीने १४ डिसेंबर २३ पासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच आर्थिक व सामाजिक लाभाची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात केली होती. त्यास आठ महिन्यांचा दीर्घ कालावधी उलटूनही राज्य शासनाने अद्यापपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कार्यवाही केलेली नाही.
त्यामुळे प्रचंड असंतोष व नाराजी असून, न्याय निर्णयाकरिता शासनाचे लक्ष वेधावे म्हणून काळ्या फिती लावून निषेध, तसेच एक तास धरणे देऊन निदर्शन आंदोलन करतील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार हळदे, महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील यांनी दिली आहे.
यावेळी महेंद्र पवार, रवींद्र आंधळे, विक्रम पिंगळे, प्रमोद ठाकरे, संजय गिरी, अजित आव्हाड, जितेंद्र पाटील, रवींद्र बाविस्कर, हमीद शेख, ज्योती केदारे, शीतल शिंदे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.