नवीन नाशिक मधील पहिल्या फार्मसी महाविद्यालयास महाराष्ट्र शासनातर्फे मान्यता

नवीन नाशिक (प्रतिनिधी): गेल्या 2 दशकांपासून इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होऊन तो फार्मसी कडे वाढल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात 2010 पूर्वी मोजकीच फार्मसी महाविद्यालये होती. मात्र या क्षेत्रात असलेल्या अमर्याद संधि लक्षात घेता प्रत्येक वर्षी फार्मसी कोर्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच गेली. व शहरात अनेक शैक्षणिक संस्थांनी फार्मसी महाविद्यालये सुरू केली.

नाशिक शहराची व्याप्ती लक्षात घेता सिडको अर्थातच नवीन नाशिक, सातपुर, पाथर्डी, वडाळा, इंदिरानगर या परिसरातील नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. साहजिकच विद्यार्थी संख्या सुद्धा लक्षणीय आहे. मात्र असे असूनही या परिसरात अद्याप पावेतो एकही फार्मसी महाविद्यालय नवीन नाशिकमध्ये अस्तीत्वात नव्हते. मात्र महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात तीन नवीन औषधनिर्माणशास्त्र संस्था सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात नाशिकच्या सिडको परिसरात “सृजन फौंडेशन्स जी. डी. बुरकुले इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च अँड एज्युकेशन इन फार्मास्युटिकल सायन्सेस” या महाविद्यालयास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सिडको परिसरातील हे पहिले वहिले फार्मसी कॉलेज ठरले आहे. सदर महाविद्यालय उपेंद्रनगर जवळील अंबड लिंक रोडवरील सिंबायोसिस महाविद्यालयाशेजारी आहे.
तत्पूर्वी मागच्या वर्षी या महाविद्यालयास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांचे तर्फे सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. शासन मान्यतेनुसार या महाविद्यालयास यंदाच्या 2024 च्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येईल. या महाविद्यालयात पदविका अर्थात डी. फार्मसी या दोन वर्षाच्या कोर्ससाठी एकूण 60 जागा तर पदवी अर्थात बी. फार्मसी या चार वर्षाच्या कोर्ससाठी एकूण 100 जागांवर प्रवेश घेता येणार आहे.
सर्व शिखर संस्था व शासनाने विहित केलेल्या मानांकांनुसार विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी, सुसज्ज ग्रंथालय, प्रॅक्टिकलसाठी लागणारे अद्ययावत मशीन्स आदि सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आल्यावरच मान्यता देण्यात येते. त्यामुळे स्थानिक व आजूबाजूच्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी घराजवळच फार्मसी महाविद्यालय आल्याने आनंदाचे वातावरण आहे. व त्यानिमित्ताने नवीन नाशिक परिसरात व्यावसायिक महाविद्यालय स्थापन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न आपल्या घराजवळच पूर्ण होणार असून पालक देखील समाधानी असतील यात शंका राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!