आखेर रेल्वेच्या मदतीला धावली एसटी : नाशिकहून १२४ बसेस मुंबईकडे रवाना

नाशिक (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरडी कोसळणे आणि झाड पडल्यामुळे मुंबई ते मनमाड ही मध्य रेल्वेची सेवा रविवारी संपूर्णपणे कोलमडली. यामुळे मुंबईकडे जाणा-या प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वे ट्रॅक दुरुस्त होण्यास लागणारा विलंब पाहता एसटी रेल्वेच्या मदतीला धावून आली. एसटी महामंडळाने नाशिकहून कसारा आणि मुंबईसाठी दिवसभरात एकूण १२४ जादा बसेस सोडल्या. यामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला.
मध्य रेल्वेच्या वाशिंद व खडवली स्थानकांदरम्यान मुसळधार पाऊस, दरड कोसळणे, रेल्वे मार्गाखालील खडीचा भराव वाहून जाण्याच्या घटनांमुळे मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकात थांबविण्यात आली. मुंबईकडे जाणा-या आणि येणा-या ११ रेल्वेगाड्यांची वाहतूक पुणे, दौंडमार्गे वळविण्यात आली. काही रेल्वेगाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून माघारी वळवण्यात आल्या. यामुळे मुंबईकडे जाणा-या नाशिकरोड स्थानकावरील प्रवाशांचे हाल झाले. सकाळपासून रेल्वेची वाट पाहणा-या प्रवाशांना ट्रॅक केव्हा सुरळीत होईल, याविषयी कोणीही माहिती देत नव्हते. मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांकडून सांगण्यात आले. सेवाग्राम एक्स्प्रेस देवळाली रेल्वे स्थानकावर थांबवून माघारी वळविण्यात आली. या रेल्वेतील प्रवाशांसाठी २० बसेसची व्यवस्था एसटी महामंडळाने केली. मुंबईकडे जाणारी पंचवटी एक्स्प्रेसही इगतपुरी रेल्वे स्थानकावर खंडित करण्यात आली. रिकामी गाडी पुन्हा मनमाडला आणली गेली.
नाशिकहून १२४ बसेस रवाना
सकाळी मुंबई रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळणे आणि झाड पडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाशी संपर्क साधला. एसटीनेही कर्मी गर्दी असलेल्या मार्गावरील बसेस मुंबईकडे वळविल्या. सकाळपासून दुपारपर्यंत कसाºयाकडे ४३, तर मुंबईकडे ८१ बसेस सोडल्या. मुंबईकडे जाणाºया मार्गावर कल्याण, ठाणे, दादर, डोंबिवली आदी मार्गांवर या बसेस सोडण्यात आल्या. दिवसभरात एसटीने जवळपास सात हजार प्रवाशांची मुंबईकडे वाहतूक केली. गरज भासल्यास आणखीही काही जादा बसेस सोडण्याची एसटीने तयारी दर्शवली आहे.
महामार्ग स्थानकावर गर्दी
सकाळी रेल्वेची सेवा कोलमडल्यानंतर मुंबईकडे जाणा-या बहुतेक प्रवाशांनी एसटीने जाण्यासाठी महामार्ग स्थानकाकडे कूच केली. एसटीने आपल्या नियमित बसेसव्यतिरिक्त जादा बसेस सोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मुंबईकडे जाणा-या प्रवाशांची झालेली गर्दी पाहून एसटी नियंत्रकांनी परिस्थिती हाताळली व प्रवाशांची गैरसोय दूर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!