सटाणा (प्रतिनिधी): सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे बंद पडलेले काम, त्याचप्रमाणे ताहाराबाद (ता.बागलाण) येथील मोसम नदीवरील पुलाचे बंद असलेले काम या पार्श्वभूमीवर चर्चा करून तात्काळ मार्ग काढण्यासाठी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या (दि.२२) रोजी दुपारी एक वाजता बागलाण तहसील कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, अशी माहिती बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी दिली.
या संदर्भात बोलताना माजी आमदार दीपिका चव्हाण म्हणाल्या, साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग हा पूर्वी राज्य महामार्ग होता. २०१७ मध्ये केंद्र शासनाने याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला. गुजरात राज्याला जोडणारा सर्वात जवळचा महामार्ग असल्याने या महामार्गावर बागलाण तालुक्यातील कातरवेल, दसवेल, ताहाराबाद, करंजाड, विरगाव, औंदाणे, सटाणा व पुढे देवळ्यापर्यंत दररोज मोठी अवजड वाहतूक सुरू असते. या गावांमध्ये शाळा, महाविद्यालये, दवाखाने, बँका, व्यापारी प्रतिष्ठाने असून महामार्गाच्या प्रलंबित कामामुळे अनेक निष्पाप नागरिकांना व विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे महामार्गाचे काम कोणत्याही परिस्थितीत तात्काळ आणि उच्च दर्जाचे व्हावे अशी तालुकावासीयांची मागणी आहे. पहिल्या टप्प्यात ताहाराबाद ते सटाणा या महामार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र ताहाराबाद गावातील मोसम नदीवरील पुलाचे काम बंद पडलेले आहे. त्यामुळे एसटी बसेस सह इतर सर्व मोठी अवजड वाहतूक सटाण्याहून नामपुर मार्गे साक्री कडे वळवण्यात आलेली आहे. तर काही वाहतूक थेट ताहाराबाद गावातून सुरू असल्याने गावातील सर्वसामान्य व्यावसायिक, दुकानदार व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसरात्र वाहतुकीचा आवाज, वाहतुकीमुळे उडणारी धूळ यामुळे ताहाराबाद गावातील जनता त्रासलेली आहे. या वाहतुकीमुळे गावात मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. दररोज प्रवास करणारा प्रवासी वर्ग आणि ताहाराबाद परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाच्या रखडलेल्या कामामुळे दैनंदिन व्यवहारांवर अडचणी येत आहेत. विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही पुलाचे काम सुरू न झाल्याने महामार्ग प्रशासनाकडून आमदार बोरसे यांच्या या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत.
त्यानंतर सटाणा शहरातील महामार्गाचे काम सुरू होताच ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम बंद पडले. त्यामुळे शहरवासीयांची आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषत: महिला वर्ग व विद्यार्थ्यांना या महामार्गावरून ये जा करणे अडचणीचे ठरत आहे. या एकूण परिस्थितीवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा, बागलाणचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार कैलास चावडे, पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली आणि महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत निवेदन दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी, नॅशनल हायवे यांच्या अंतर्गत रस्ता रुंदीकरणाचा आणि काँक्रिटी करण्याचे काम सुरू आहे, त्या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर्स, पालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आदींच्या उपस्थितीत उद्या दिनांक २२ जुलै रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीस तालुक्यातील संबंधित गावांमधील आजी-माजी लोकप्रतिनिधी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे असे आवाहनही माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केले आहे.
