नवीन इमारत कार्यान्वित करा; साळुंके यांचे कृषीमंत्री यांच्याकडे साकडे
सटाणा (प्रतिनिधी): शासनाने मंजूर केलेले ताहाराबाद येथील कृषी मंडल कार्यालय नावाला असून तेथील इमारत मागील काही वर्षांपासून बंद पडलेली आहे तिची अवस्था खूप खराब असल्यामुळे, मंडल चे कामकाज बागलाण मधून चालते. त्यामुळे बळीराजाची सोय होण्याऐवजी गैरसोयच जास्त होत आहे. ते पूर्ववत ताहाराबाद येथे सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष आकाश साळुंके यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे
येथील कृषी विभागाचे मंडल कार्यालय अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शासकीय कामकाजासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ताहाराबाद येथे मंडल कृषी कार्यालय सुरू करण्यात आले होते. बागलाण विभागाचे कार्यालय ताहाराबाद येथील इमारतीत असून त्या इमारतीचे तीन तेरा वाजले आहेत इमारत नष्ट होण्याच्या मार्गांवर आहे तरी अद्याप कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही ही शोकांतिका आहे , सदरचे कार्यालय कायमच बंद व पडीत असल्याने शेतकरी कामानिमित्त येतात मात्र त्यांना मंडल अधिकारी, जकातदार हे भेटत नाही त्यांचे कधीही दर्शन होत नाही तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव व परिसरातील एकमेव कृषी विभागाचे कार्यालय गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बंद ,पडीत आहे. संबंधित अधिकारी यांना वारंवार लेखी तोंडी तक्रारी केल्या तरी देखील दुर्लक्ष केले गेले परंतु मागिल वर्षी नागरिकांनी तक्रार केली असता सटाणा येथील काही अधिकारी आले व पहाणी करून गेलेत पण अजुन काहीच कार्यवाही झाली नाही . यामुळे ताहाराबाद व परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत शेती विषयक माहिती, योजना पोहचत नाही यामुळे नवीन कृषी कार्यालयासाठी इमारत मंजुरी करावी या आशयचे निवेदन साळुंके यांनी कृषिमंत्री मुंडे यांना दिले आहे.
“फळबागासाठी शासन कृषी विभागाच्या माध्यमातून रोपे, अनुदान येत असते. शेतीसाठी औजारे अनुदानावर येत असतात. परंतु याचा लाभ मोठमोठे बागायतदार शेतकरी कृषी अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून लाभ घेत असतात. परंतु सर्वसामान्य शेतकरी वर्गास याची माहिती भेटत नसल्याने तो या लाभापासून वंचित राहत असतो.”
समाधान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, सोमपूर
