घोटी (प्रतिनिधी) : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणा-या इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी (दि. ३) तालुक्यात ६९ मिमी, तर हंगामात आतापर्यंत १६०६ मिमी पाऊस झाला. संततधारेमुळे तालुक्यातील भावली, भाम, दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, शनिवारी (दि.३) १९ हजार ५५५ क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.
मागील वर्षी ऑगस्टच्या प्रारंभी तालुक्यात २१७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा गतवर्षाच्या तुलनेत अद्याप ५७८ मिमी कमी पाऊस पडला असला, तरी गेल्यावर्षीची तुलनादेखील भरून काढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तालुक्यासाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले असून, समाधानकारक पाऊस होत असल्याने बळीराजाही सुखावला आहे.
इगतपुरी तालुक्यात शुक्रवार (दि. २) पासून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. शनिवारीदेखील पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. कसारा घाटातही मुसळधार पाऊस असल्याने धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. तालुक्यात सर्वत्र समप्रमाणात पाऊस झाल्याने भात लागवडीच्या कामाला गती आली आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे कसारा घाटातील रेल्वे रूळावर दरड कोसळल्याने काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत होती. भावली धरण आठ-दहा दिवसांपासून ओसंडून वाहात आहे, तर दारणातून १९ हजार ५५५ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
तालुक्यातील त्रिंगलवाडी, बलायदुरी, मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, आडवण, टाके घोटी, बोरटेंभे, भावली, मानवेढे, बोर्ली, गिरणारे, टिटोली, नांदगाव सदो, पिंप्रीसदो, तळेगाव, आवळखेड, दौंडत, चिंचलेखैरे, देवळे, खैरगाव, खंबाळे, इंदोरे, गिरणारे, काळुस्ते, शेनवड, मुंढेगाव परिसरात समाधानकारक पाऊस पडला.
