प्रमोद वाघचे मारेकरी काही तासांत जेरबंद!

नाशिक (प्रतिनिधी): पूर्ववैमनस्यातून लोखंडी सळईने तरुणावर हल्ला करत त्याची हत्या केल्याचा प्रकार सिन्नर फाटा परिसरात शुक्रवारी (दि. २) सायंकाळी घडला. या घटनेत प्रमोद केरूजी वाघ (वय ४०) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सद्दाम सलीम मलिक (वय ३३, रा. मंदाकिनी चाळ, ना.रोड) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने संशयिताच्या काही तासातच मुसक्या आवळल्या आहेत. संशयिताचा आणखी एक साथीदार अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रमोद केरूजी वाघ (वय ४०) याच्यावर सिन्नर फाटा येथील यश टायर्स या दुकानासमोर प्राणघातक हल्ला झाला. जमिनीच्या वादातून संशयित सद्दाम मलिक याने मृताचा नातेवाईक असलेला योगेश रमेश पगारे (रा. चेहडी शिव, सिन्नर फाटा) या साथीदाराच्या मदतीने हा हल्ला केला होता. संशयित नातेवाईक पगारे यांच्याशी दुचाकीवर बसून बोलत असताना पाठीमागून आलेल्या संशयित सद्दाम याने वाघ यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला केला होता. एका पाठोपाठ एक वर्मी घाव घालण्यात आल्याने वाघ गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर हल्लेखोराने वाघ यांची दुचाकी घेऊन पोबारा केला होता. रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत वाघ व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे पथक शोध घेत होते. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही यंत्रणेत मिळालेल्या फुटेजच्या आधारे भरपावसात रात्र जागून काढली. संपूर्ण शहर पिंजूनही संशयित हाती लागत नव्हता. सकाळी हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वडाळा गावातील राजवाडा भागात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
संशयिताने दिली कबुली
मलिक रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो रात्रभर वेश बदलून पोलिसांना चकवा देत होता. संशयिताने मृताचा नातेवाईक असलेल्या योगेश पगारे याच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. दरम्यान, संशयितास नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, धनंजय शिंदे, समाधान पवार व जगेश्वर बोरसे आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!