रक्षाबंधन: सुदृढ भावबंधाचे रेशीम धागा झाला घट्ट

नाशिक (प्रतिनिधी) : लाडक्या बहिणीने आपल्या भाऊरायाला राखी बांधत त्याच्या दीर्घायुष्याची कामना केली. बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय. हा सण सोमवारी (दि.१९) नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरोघरी पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. कोणताही मुहूर्त न पाहता दिवसभर रक्षाबंधनाचा सण साजरा झाला.
दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. सोमवारी रक्षाबंधन असले, तरी भद्राकाळ पाहिल्यास दुपारी दीडनंतर राखी पौर्णिमा साजरी करावी, असे सांगितले जात होते. तरी आपापल्या श्रद्धेनुसार अनेकांनी सोमवारी दुपारनंतरच रक्षाबंधन साजरे केल्याचे दिसून आले.
ज्या भावा-बहिणींना समक्ष भेटणे शक्य होते त्यांनी उत्साहात हा सण साजरा केला असला, तरी जे भाऊ-बहीण दूर राहतात. त्यांनी टपाल, कुरियरने राखी पाठवून, तर काहींनी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून आॅनलाइन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. अनेक भावा-बहिणींनी एकमेकांना फोन, तसेच समाज माध्यमांवरून शुभेच्छा दिल्या. दिवसभर पौर्णिमा तिथी असल्यामुळे बहुतेकांनी कोणताही मुहूर्त न पाहता श्रद्धापूर्वक भावाने बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधून घेतली. भावांनी विविध भेटवस्तू, चॉकलेट्सची ओवाळणी देऊन आपल्या बहिणीच्या संरक्षणाचा विश्वास दिला.
रक्षाबंधनानिमित्त राखी खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. रेशीमच्या राख्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती, तसेच स्टोन राखी, देवराखी, जरदोजी डायमंड, ईडी पॅटर्न, ब्रेसलेट राखी, मेटल राखी यासाख्या फॅन्सी राख्यांसह पारंपरिक पद्धतीच्या राख्या उपलब्ध होत्या. म्युझिकल व लायटिंग असणा-या राख्यांना बच्चे कंपनीची चांगलीच पसंती मिळाली. नाशिकच्या मेन रोड, एम. जी. रोड, सिडको, नाशिकरोड, सातपूर आदी उपनगरांमध्ये विविधरंगी व व्हरायटीच्या राख्यांचे स्टॉल सजले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!