शिकारीला आलेल्या बिबट्याचाच झाला मृत्यू!

पिंपळगाव बसवंत (प्रतिनिधी): मोराला पाहून त्याची शिकार करण्यासाठी झेपावलेल्या बिबट्यासह मोराचा ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मृत्यू झाला. पिंपळगाव शहरातील घागरनाला शिवारातील नंदू देशमाने यांच्या शेतात शनिवार (दि. २०) च्या मध्यरात्री ही घटना घडली. वन विभागाच्या अधिकाºयांनी रविवार (दि.२१) सकाळी घटनास्थळी भेट देत मृत मोरासह बिबट्याचा पंचनामा करत पुढील कार्यवाही केली.
पिंपळगाव बसवंत शहरातील घागरनाला परिसरासह उंबरखेड रोड परिसरात गत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. या बिबट्याने गत महिन्यात आ. दिलीप बनकर यांच्या मळ्यातील वासराची शिकार केली, तर परिसरात असलेल्या देशमाने यांच्या शेतातील चार कुत्रे फस्त केले होते. याच परिसरात शिकारीच्या उद्देशाने फिरणाºया बिबट्याने शनिवारी मध्यरात्री मोराचा पाठलाग केला. मात्र, मोर लगत असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसला असता त्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने झेप घेताच या ट्रान्सफॉर्मरचा करंट लागल्याने मोरासह बिबट्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत मृत मोरासह ९ वर्षीय नर जातीच्या बिबट्याचा पंचनामा केला.
शिरवाडे वणी येथील वनविभाग हद्दीत मृत मोरावर शासकीय नियमानुसार अंत्यविधी करण्यात आले. याप्रसंगी वडनेर भैरव येथील वनपरिमंडल अधिकारी अजय शिंदे, वनरक्षक नाना टेकणार, वनसेवक वसंत देवरे, सर्पमित्र स्वप्नील देवरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!