नाशिक (प्रतिनिधी) : ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात शहरासह जिल्ह्यात पावसाने सोमवारी जोरदार कमबॅक केले. नाशिक शहरात तर केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले. भुयारी गटार ओव्हरफ्लो झाल्याने पाणी थेट गोदावरी नदीपात्रात घुसले. रस्त्यावरून वाहणा-या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागला, तसेच शहरातील उड्डाणपूल आणि पुलाखालून जाणा-या रस्त्यावरदेखील पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. हवामान विभागाने सोमवारपासून पुढील चार दिवस म्हणजेच गुरुवार (दि.२२) पर्यंत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
आठवडाभराहून अधिक काळ पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे उन्हाच्या चटक्यासह वातावरणातील उकाडादेखील वाढल्याचा अनुभव जिल्हावासीयांना येत होता. शहरवासीयांनी हंगामातील पहिला पूर अनुभवल्यानंतर जणू पाऊस गायबच झाल्याचे चित्र निर्माण झाले होते; परंतु रविवारपासून पावसाने पुन्हा कमबॅक केले असून, जिल्ह्यात सिन्नरसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाचे पाणी नाशिकच्या बाजारपेठांमध्ये घुसले. यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. सराफ बाजार, हुंडीवाला लेन, दहिपुलासह जुन्या नाशिकमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबई नाका, गोविंदनगर परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला होता.
सोमवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सरासरी ९.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी तालुक्यात २४ तासांमध्ये ३५.९ मिमी, तर नांदगाव तालुक्यात २४.९ मिमी पावसाची नोंद झाली. येवल्यात १, सिन्नरमध्ये ९.१ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने कमबॅक केले असून, येवला, बागलाण, मालेगाव, नाशिक आणि निफाड तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, जळगाव बुदु्रक येथे विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे गणेश बोडखे या शेतक-याच्या बैलाचा रविवारी (दि. १८) रात्री मृत्यू झाला.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ९३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १५ पैकी पाच तालुक्यांमध्ये पाऊस महिन्याची सरासरी गाठू शकलेला नाही; परंतु उर्वरित १० तालुक्यांमध्ये आॅगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांतच सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १६९ टक्के पाऊस कळवणमध्ये, तर बागलाणमध्ये १६ टक्के पाऊस झाला आहे. चांदवडमध्ये १५६, दिंडोरीत १५२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातून विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणचे रस्ते तुंबल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांना गाडी चालवताना चांगलीच कसरत करावी लागली. पावसाने शहरातील मेन रोड, रामकुंड, फूल बाजार, सराफ बाजार, द्वारका, सिडको, सातपूर, नाशिकरोडसह आदी भागांत तासभर मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे जागोजागी रस्ते तुंबल्याचे पाहायला मिळाले.
