नाशिक (प्रतिनिधी): तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी आदिवासी जमीन ही बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्जाद्वारे परवानगी मागितली आहे. या अर्जानुसार इगतपुरी तहसिलदार यांनी भरवज निरपण ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या पाठपुराव्यानुसार तक्रारदाराने ग्रामसेविका सुवर्णा आहेर यांची भेट घेतली असता त्यांनी ठराव देण्याच्या मोबदल्यात तीस हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.
यावेळी जमीन विक्रीचा ठराव देण्याच्या मोबदल्यात २० हजारांची लाच स्वीकारणा-या भरवज निरपण (ता. इगतपुरी) येथील ग्रामसेविकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई सिन्नर मार्गावरील घोटीफाटा परिसरात करण्यात आली. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा छगन आहेर असे लाचखोर ग्रामसेविकेचे नाव आहे.
एसीबी पथकाने पडताळणी अंती मंगळवारी (दि.७) ही कारवाई केली. ठरल्यानुसार तक्रारदाराने मंगळवारी ग्रामसेविका आहेर यांची सिन्नर – घोटी मार्गावरील घोटीफाटा उड्डाणपूलाखाली भेट घेतली असता तिला वीस हजार रूपयांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिक तपास निरीक्षक अमोल वालझाडे करीत आहेत.
