निर्धारित कोटा पूर्ण केल्यास विजयीमतमोजणी करताना निवडणूक आयोगाकडून विजयासाठी कोटा निश्चित केला जातो. निर्धारित कोट्याइतकी प्रथम क्रमांकाची मते जो उमेदवार मिळवेल, तो विजयी होतो. यातही पहिल्या पसंतीची मते कोट्याइतकी मिळाली नाही, तर दुस-या पसंतीची मते जो उमेदवार पूर्ण करेल, तो विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. जिंकून येण्यासाठी उमेदवाराला ५० टक्के अधिक १ मत आवश्यक असते. त्यासाठी कोटा पद्धत वापरली जाते.
नाशिक (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचा प्रतिनिधी कोण, याचा फैसला सोमवारी (दि. १) होणार आहे. राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात एकूण २१ उमेदवार आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर दराडे, शिवसेना (ठाकरे गट) अॅड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे, टीडीफचे भाऊसाहेब कचरे यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजेपासून अंबड येथील वखार महामंडळाच्या गोदामात सुरुवात होणार आहे.
पसंतीक्रमामुळे निकाल लागण्यासाठी मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी ५० टक्के अधिक १ मतांचा असा कोटा पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा कोटा पूर्ण करण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेता रात्री उशिरा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वात मतमोजणी प्रक्रियेसाठी १८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे, तसेच मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या भागात समर्थकांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, एक किलोमीटर दूरपर्यंत प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.
मतमोजणीला प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येईल. त्यानंतर ५० चा प्रत्येकी एक गठ्ठा करून त्यातून वैध आणि अवैध मते बाजूला करून पुन्हा मतपत्रिकांची सरमिसळ केली जाईल. यानंतर प्रत्येकी एक हजाराचे गठ्ठे करण्यात येऊन ते पुन्हा टेबलवर पाठवून त्यांची मतमोजणी करण्यात येईल. विभागाच्या मतमोजणीसाठी ३० टेबल ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक आणि दोन कर्मचारी असतील. याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी सुमारे ६ टेबलवर अशी व्यवस्था राहणार आहे.
