धोंड्या धोंड्या पाऊस पडू दे रे…

दमदार पावसाची प्रतीक्षा: महिनाभरात फक्त १५ टक्के पर्जन्य

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १५ टक्के पाऊस पडला आहे. काही भागात झालेल्या चांगल्या पावसामुळे जवळपास ७० ते ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, काही भागात अद्याप पेरणीयोग्य पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक शहरात अजूनही दमदार पाऊस पडलेला नाही. बहुतांश धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या या परिसरात पाऊस नसल्याने धरणांनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. तर, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात केवळ २० जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याने ‘ये रे ये रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.
ज्या शेतकºयांजवळ सिंचन विहिरी, बोअर आहेत, ते तुषार सिंचनाद्वारे सोयाबीन, बाजरी, संकरित ज्वारी, ऊस, कांदा व भाजीवर्गीय पिकांना पाणी देताना दिसत आहेत. परंतु, अशी सुविधा नसलेल्या शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. कारण खते, बी-बियाणे पेरणीचा खर्च परवडणारा नसूनदेखील शेतकºयांनी ७० ते ८० टक्के पेरण्या केल्या आहेत. परंतु, आता पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. यावर्षी सुरुवातीलाच मृग नक्षत्रात थोडा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी असलेल्या ओलीवर पेरण्या करून घेतल्या. मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने व तापमान जास्त प्रमाणात झाल्याने या भागातील पिके पाण्याअभावी माना टाकत आहेत.
——–
पावसाचे तालुके तहानलेले!
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, नाशिक या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. याच तालुक्यांमध्ये मोठी धरणे आहेत. या धरणांतून जिल्ह्यासह नगर, ठाणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. या तालुक्यांमध्ये जून महिन्याच्या ५० ते ६० टक्केच पाऊस आतापर्यंत पडला आहे. जून महिन्यातील पावसाची तूट जुलैमध्ये भरून निघेल, अशी आशा आहे. याउलट जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग नेहमीच अवर्षणग्रस्त असतो. यावर्षी तेथे समाधानकारक पाऊस बरसला आहे. नेहमीच दुष्काळग्रस्त मानल्या गेलेल्या नांदगाव तालुक्यात १४२, येवला तालुक्यात १२५, तर सिन्नर तालुक्यात १४० टक्के पाऊस पडला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापूर व दारणा धरणातील पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे ८.९ व ५.२ टक्के पाऊस पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!