दोन दिवसाच्या पावसामुळे गंगापूरच्या जलसाठ्यात ५ टक्यांने वाढ!

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणा-या गंगापूर धरणात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२३) सकाळी ६ वाजेपर्यंत गंगापूर धरणात ३६.८२ टक्के साठा असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु, दिवसभर संततधार पाऊस सुरुच राहिल्याने यात आणखी दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत आहे.
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम स्वरुपाच्या २४ धरणांमध्ये २९. ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मंगळवारी दिवसभरात शहरात २५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तर घोटीला ९१ मिलीमिटर, इगतपुरी १२३, त्र्यंबकेश्‍वर ८४, आंबोली ११२ मिलीमिटर पाऊस पडल्याने नैसर्गिक नाल्यांमधुन पाणी वाहु लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची पाऊले त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या दिशेने वळू लागले आहेत. या पावसामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय खरिप हंगामाला जीवदान मिळाले आहे. मात्र दुष्काळग्रस्त येवला, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पुढील २४ तासांत घाट माथ्यावरील भागासाठी हवामान विभागाने ‘आॅरेंज‘ अलर्ट जारी केला आहे. तसेच शहरात दिवसभर रिपरिप सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!