नाशिक (प्रतिनिधी): गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या पूररेषांची फेरआखणी करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर नदी प्रदूषणमुक्तीकरिता उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याने गोदावरी आणि उपनद्यांच्या पात्रातील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
नदी प्रदूषणासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने उपाययोजना राबविण्याचे आदेश देऊनही संबंधित यंत्रणांकडून दखल घेतली जात नसल्याने प्रदूषणाचा विळखा कायम आहे. गोदावरी प्रदूषणमुक्ती, तसेच प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी विभागीय महसूल आयुक्त तथा उच्चस्तरीय समिती अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली दि. २९ जुलै रोजी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. करंजकर यांच्या उपस्थितीत मनपा मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी गोदावरीसह उपनद्यांच्या निळ्या पूररेषांतील बांधकामांविषयी चर्चा करताना पूररेषांची फेरआखणी करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. पूररेषांच्या आखणीनंतर नदीपात्रांतील पक्की बांधकामे हटविण्यात येणार असून, तशा सूचना त्यांनी संबंधित खातेप्रमुखांना दिल्या आहेत. नदीपात्रांत सांडपाणी, तसेच रसायनमिश्रित पाणी मिसळणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही करण्यात आली. पंचवटीतील तपोवन, व आगरटाकळी या एसटीपींचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश मलनिस्सारण विभागाला देण्यात आले आहेत.
