खांडे मळा भागात रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी फलकावर चिकटविले होते निवेदन!
नवीन नाशिक (प्रतिनिधी): खांडे मळा परिसरातील कॉलनीअंतर्गत रस्ते २०२१ पासून अतिशय वाईट स्थितीत असून, आतापर्यंत वारंवार निवेदने देऊनही मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. याबाबत रहिवाशांनी मनपा बांधकाम उपअभियंता हेमंत पठे यांना निवेदन सादर केले. परंतु, त्यांनी ते स्वीकारण्यास नकार देत, एक खिडकीवर देण्याचे सांगितले व कार्यालयातून बाहेर निघून गेले. त्यामुळे नागरिकांनी ते निवेदन त्यांच्या फलकावर चिकटून रोष व्यक्त केला.
खांडे मळा भागात तात्पुरते खड्डे बुजवून लवकरच रस्त्याचे काम सुरू करू, असे आश्वासन मनपा अधिका-यांकडून दरवर्षी देण्यात येते. परंतु, आजपावेतो ते काम झालेले नाही. यावर्षी तर रस्त्यांवरील खड्डे चक्क काळ्या मातीने भरण्यात आले आहेत. परिणामी पावसामुळे या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याबाबत संबंधित अधिका-यांशी बोलले असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे या अधिका-यांवर कार्यवाही करण्याची मागणी खांडे मळा परिसरातील रहिवाशांनी केली, या भागातील रस्ते त्वरित दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला होता. याप्रसंगी राहुल दरोडे, भिकाजी भदाणे, अमित खांडे, नागेश काटकर, ऊर्मिला खांडे, शीतल पवार, लीना काटकर, प्रणिता पागरे, विद्या नेरपगार, लीना शिंदे, सुगंधा भुजबळ, रमेश रहाटळ, हर्षल डफाल आदींसह रहिवासी उपस्थित होते.
या संतप्त रहिवाशांचा रोष बघता उपअभियंतानी प्रभाग क्रमांक 24 मध्ये गॅसपाईपलाईन मुळे ठिक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधील माती काढून खड्ड्यांमध्ये जेसीबीने मटेरीयल टाकण्याचे काम चालु केले आहे.