माज आ. चव्हाण म्हणतात चौकशीसाठी जिल्हा परिषदेकडून समितीची केली नियूक्त
तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी): बागलाण तालुक्यातील जलजीवन योजनांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून कामांमध्ये आमदारांच्या विश्वासातील ठेकेदार व अधिकारी यांच्यात संगनमताने शासनाच्या करोडो रुपयांचा अपहार होत आहे. या भ्रष्टाचाराबाबत आपण केलेल्या उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा परिषदेला याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याने जिल्हा परिषदेकडून तालुक्यातील जलजीवन कामांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तातडीने समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी दिली.
याबाबत बोलताना माजी आमदार सौ.चव्हाण म्हणाल्यात की, गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे बागलाण तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. तालुक्यात जवळपास ३५ ते ४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत पाणीटंचाई असल्याने अनेक गावांमध्ये टॅंकरने जेमतेम पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत जलजीवन योजनांची कामे योग्यरीत्या चांगल्या दर्जाची झाली असती तर कदाचित ही टंचाई जाणवली नसते. मात्र निकृष्ट कामामुळे तालुक्यातील अनेक गावांच्या जलजीवन योजना सध्या अपूर्णावस्थेत आहेत.
जलजीवन योजना ही ग्रामीण भागातील जनतेला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी राबविली जात आहे की, ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी राबविली जात आहे, अशी संतप्त भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे. तालुक्यातील सर्व जलजीवन योजनांमध्ये ठेकेदार व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार करीत असून बागलाणचा कारभार लोकप्रतिनिधी चालवत आहेत की ठेकेदार? असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे. ठेकेदार व अधिकारी यांच्याकडून संगनमताने भ्रष्टाचार सुरू असल्याने त्याचा परिणाम तालुक्यातील गावागावातील सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहेत.
जलजीवन योजनांच्या कामांमधील भ्रष्टाचाराची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. भेटीत त्यांना तालुक्यातील जलजीवन योजनांच्या भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा परिषदेला आता याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेने तालुक्यातील जलजीवन कामांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता पी.टी.बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांच्या समितीची नियुक्ती केली असून समितीला पंधरा दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आल्याचेही माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी स्पष्ट केले.
कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे बागलाण तालुक्यात जलजीवन योजनांचा फज्जा उडाल्याच्या तक्रारी तालुक्यातील जनतेकडून झाल्यामुळे राज्य शासनाकडे या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. आता चौकशी समिती प्रत्यक्ष चौकशीला गावात आल्यावर संबंधित गावातील ग्रामस्थांनी सतर्कतेने त्यांना जलजीवन योजनेतील झालेल्या निकृष्ट कामाची व भ्रष्टाचाराची माहिती द्यावी.
–दीपिका चव्हाण, माजी आमदार