इंदिरानगर परिसरातील विजेचा प्रश्न सुटाणार; उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरणाचे आदेश

नाशिक (प्रतिनिधी): वडाळागाव येथे नवीन ३३/११ केव्हीचे वीज उपकेंद्र साकारण्यात येणार असून, या केंद्रासाठी महापालिकेने महावितरणला जागा हस्तांतरीत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना दिले आहेत. वीज उपकेंद्रामुळे इंदिरानगर भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. वडाळा येथे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र आरडीएसएस योजनेमध्ये प्रस्तावीत असून जागेसंदर्भात महापालिकेकडून नाममात्र दराने जागा हस्तांतरीत करण्यासाठी ना हरकत देण्यात आलेली आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील मुख्य कार्यालय मुंबई येथे पाठविण्यात आलेला आहे. त्याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बैठकीला महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र उपस्थित होते. यावेळी आ. फरांदे यांनी इंदिरानगर भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे या ठिकाणी नवीन सबस्टेशन होण्याची आवश्यकता असल्याचे सांगत मनपाकडून जागा देण्याबाबत ना हरकत दिली असल्याचे सांगितले. यावर महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी जागा हस्तांतरितची मागणी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरध्वनीवरून नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना जागा हस्तांतरित करून देण्याचे आदेश दिले.
त्याचप्रमाणे आ. फरांदे यांनी द्वारका उपविभागाचे विभाजन करण्यात येऊन भारतनगर व सांगवी येथील उपकेंद्राची क्षमता वाढवण्याबाबत उपमुख्यमंत्र्याकडे मागणी केली. द्वारका उपविभाग हा मोठा असल्यामुळे या ठिकाणी नियंत्रण ठेवणे अवघड होत असल्याचे त्यांनी नमूद करत उपविभागाचे दोन भाग होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे इंदिरानगरचा वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यामुळे आ. फरांदे व नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते सतीश सोनवणे, माजी नगरसेवक श्याम बडोदे, अजिंक्य साने तसेच मंडल अध्यक्ष सुनील देसाई, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, सुनील खोडे, चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, भरत कवरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!