नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर करत घोषणांचा पाऊसच पाडला आहे. या अर्थसंकल्पात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सरकारने जाहीर केल्या. आठ लाख रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ होणार असल्याने पालकांवरील शिक्षणाचे आर्थिक दडपण दूर होण्यास मदत होईल. अन्नपूर्णा योजना – गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. महिला बचत गट निधीची रक्कम १५ हजाराहून ३० हजारांपर्यंत वाढवण्यात आली. २१ ते ६० वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत दिड हजार दरमहा मिळणार यासोबतच उद्योजक महिला व व्यावसाय करू इच्छिता यांच्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवून देणाऱ्या अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त युवकांना कार्यप्रशिक्षण विद्यावेतन यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल. शेतकरी, दुग्धव्यासायिक याना अनुदान मिळणार आहे तर वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या निधीची घोषणा करण्यात आली.
राज्यभरात पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित कर एक समान करण्याची तरतूद केली आहे त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर काही प्रमाणात का होईना कमी होऊन सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी हा अर्थसंकल्प महिलांचे सक्षमीकरण, सर्वसमावेश व सर्वसाधारण लोक, शेतकरी यांना दिलासा देणार आहे.
– योगेश कातकाडे, कर सल्लागार
जनसंपर्क प्रमुख – नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन