राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साई सावली फाउंडेशनच्या सदस्यांना लेखी आश्वासन
तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी): शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी ह्या महामार्गाचे दोध्येश्वर नाका ते जिजामाता गार्डन दरम्यान रस्ता काँक्रीटीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण न काढताच रस्त्याचे काम सुरू करण्यात आहे. याबाबत साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे व इतर सदस्यांनी अतिक्रमण न काढता काम केल्यास आत्मदहनाचा इशारा प्रशासनास दिला होता. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सतिष आहेर, नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व साई सावली फाउंडेशनचे पदाधिकारी यांची सयुक्त बैठक सटाणा पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दि.२९ पासुन रस्त्याच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण रेषा निश्चित करुन अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन १२ जुलैनंतर अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येईल त्यानंतरच पुढील रस्ता काम सुरु होईल याबाबतचे लेखी पत्र आत्मदहन करणाऱ्या साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, भुषण निकम, चेतन सुर्यवंशी, पंकज सोनवणे, प्रफुल्ल कुवर, संदिप सोनवणे, शुभम शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनवणे, सुरज सोनवणे व पदाधिकाऱ्यांना दिल्याने १२ जुलै पर्यंत आंदोलन स्थगित करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
कारवाई न केल्यास १३ जुलैला आत्मदहन
प्रशासनाने १२ जुलै पर्यंत अतिक्रमण काढण्याबाबत लेखी दिलेले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेत दि. २९ जूनचे नियोजित आत्मदहन स्थगित करण्यात येत आहे. मात्र १२ जुलै नंतर प्रशासनाने कारवाई न केल्यास १३ जुलैला आत्मदहन आंदोलन करण्यात येईल.
– प्रशांत कोठावदे, अध्यक्ष साई सावली फाउंडेशन