नाशिक (प्रतिनिधी): आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून एकास कारमध्ये डांबून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडला. अपहरण कर्त्याने बेदम मारहाण करीत कर्जदारास निर्जनस्थळी सोडून देत पोबारा केला असून सदर इसमाने कसेबसे घर गाठून पोलिसात धाव घेतली आहे. या घटनेने पुन्हा एकदा या परिसरातील बेकायदा सावकारी चर्चेत आली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, शंतनू जाधव (रा. नाशिकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित अपहरणकर्त्याचे नाव आहे. याबाबत योगेश पांडूरंग हिरे (वय ४५ रा. जाधव संकुल, अशोकनगर) यांनी फिर्याद दली आहे. तक्रारदार हिरे व संशयित जाधव यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. सोमवारी (दि.१७) हिरे आपल्या घरी असताना जाधव कार घेवून घरी आला. त्याने हिरे यांना आपल्या कारमध्ये बसवून नाशिकरोड येथील आपल्या घरी त्यांना नेले. त्यानंतर देवळाली भगूर मार्गे वाडिवºहे परिसरातील निर्जनस्थळी घेवून जात पैशांच्या कारणातून शिवीगाळ व दमदाटी करीत हिरे यांना मारहाण केली. तसेच हिरे यांना या ठिकाणी सोडून देत त्याने पोबारा केला. हिरे यांनी कसे बसे घर गाठून पोलिसात धाव घेत घडलेला प्रसंग कथन करीत तक्रार दिल्याने याप्रकरणी पोलीस दप्तरी अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नळकाडे करीत आहेत.
