विधानपरिषद निवडणुक: २९ मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळाचे अंतीम नियोजन!

नाशिक (प्रतिनिधी): विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्हा प्रशासनाची तयारी गतिमान झाली असून, जिल्हाभरात एकूण २९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला आवश्यक मनुष्यबळाचे अंतीम नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यात नाशिक शहरात त्यासाठी १० केंद्र उभारण्यात आले असून बहूतांश शिक्षक मतदार शहरात वास्तव्यास असल्याने त्यांची संख्या जास्त आहे. या निवडणुकीसाठी कर्मचा-यांना गुरुवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले.
नाशिक जिल्हातील शिक्षक मतदार संघातील २५ हजार ३०२ मतदारांच्या अनुषंगाने जिल्हाभरात २९ केंद्राद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात प्रामुख्याने देवळा, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ, त्रंबक, इगतपुरी, सिन्नर येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र, सटाणा, येवला, निफाड साठी प्रत्येकी दोन मतदान केंद्र, मालेगाव शहर एक व ग्रामीण दोन असे तीन मतदार केंद्र, तर नाशिक शहर व परिसरासाठी दहा मतदान केंद्र अशा एकुण २९ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. या मतदान केंद्राच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रासाठी सहा कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. त्यात एक केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षक, एक शिपाई असे ६ कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहेत. त्यासांठी १७४ कर्मचा-र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच बंदोबस्तासांठी फ्लाईंग स्कॉड राहणार आहे. त्यात २ पोलीस कर्मचारी, व्हिडीओ पहाणी पथक-१, भरारी पथक-१, व्हिडीओ निरिक्षक-१ असे ५ जणांचे पथक राहणार आहे. जिल्हा प्रशासन या सर्व बाबींचे नियोजन अंतीम करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी लागणा-या कर्मचारी व अधिका-यांची नेमणूक, त्याच्या वाहनांची व्यवस्था व सतर नियोजनही गतिमान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!