नाशिक (प्रतिनिधी) : विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बससेवेतील सुमारे ४०० ते ४५० चालकांनी शनिवारी (दि. २७) पहाटेपासून अचानक संप पुकारला. त्यामुळे मनपाची शहर बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. संपप्रकरणी मेस्मा कायद्यांतर्गत परिवहन महामंडळाने नाशिकरोड आणि आडगाव पोलीस ठाण्यात चालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही हाती घेतली आहे.
वारंवार संप होत असल्याने त्यास अटकाव घालण्यासाठी महापालिकेने मेस्मा कायदा लागू करण्याबाबत संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करून हा कायदा पहिल्या टप्प्यात सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. या कायद्यानंतरही शनिवारी (दि. २७) संप पुकारल्याने अखेर सिटीलिंक व्यवस्थापनाने आडगाव आणि नाशिकरोड या दोन पोलीस ठाण्यांत चालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. संप सुरूच राहिला, तर संपात सहभागी झालेल्या सर्वच चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सिटीलिंकचे मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी यांनी दिला आहे. वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी दि. १३ जुलै रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली संपाचा निर्णय घेण्यात आला होता. मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन बस आॅपरेटर्सकडून देण्यात आल्याने १५ दिवसांची मुदत देण्यात आली. परंतु, त्यानंतरही काही मागण्या मान्य न झाल्याने चालकांनी संप पुकारल्याने बससेवा ठप्प झाली.