राज्यात २३ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात २३ जूनपासून पावसाचा जोर वाढणार आहे. शेतक-यांनी मान्सूनच्या मंद वाटचालीकडे गांभीर्याने बघावे. कारण लवकरच मान्सून सक्रिय होणार असल्यामुळे खात्रीच्या पूर्ण ओलीवरच शेतकºयांनी पेरणीचा विचार करावा, असा सल्ला ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
मजबूत अरबी समुद्रीय पश्चिमी वारे व किनारपट्टीवरील ३१०० मीटर उंचीवरचा हवेतील दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाचा आसच्या अस्तित्वामुळे दि. १८ पासून आठवडाभर मुंबई व कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते, तर दि. १८ ते २२ जून या पाच दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश, तसेच नाशिकसह २९ जिल्ह्यांत मात्र केवळ तुरळक ठिकाणीच मध्यम पावसाचीच शक्यता आहे.
दरवर्षी मान्सूनच्या आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जून महिन्यातील कमकुवतपणा यावर्षीही दिसून आला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट मान्सूनचे वारे वाहात आहे. या व्यतिरिक्त मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही. म्हणून महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवते.
सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला, तरी आजची स्थिती पाहता, महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून मान्सूनच्या दोन्हीही शाखा जागेवरच खिळलेल्या दिसत आहेत. पाच दिवस पावसाचा जोर कमी होणार म्हटल्यावर महाराष्ट्रातील बºयाच शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
