सटाणा (प्रतिनिधी): बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणावर हरणबारी उजवा कालवा असून त्या माध्यमातून पावसाळ्यात धरणाचे पूर पाणी व उर्वरित वेळी सिंचन व पिण्यासाठीचे पाणी उपलब्ध करून दिले जाते.परंतु दरवर्षी या कालव्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवून तसेच दगड माती कोसळून नाल्यातील पाणी प्रवाहास अडथळे निर्माण होतात.
आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चातून हरणबारी उजवा कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला असून सोमवारी(दि.१७) लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.चार पोकलॅण्ड मशीनच्या साह्याने कालव्याच्या स्वच्छता आणि दुरुस्तीस सुरुवात झाली असून यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून विशेष समाधान व्यक्त होत आहे.
कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसानही होते. बहुतांशी वेळी शेतकऱ्यांनाच एकत्रित येत लोकवर्गणी जमा करून आपापल्या परीने मिळेल त्या साधनसामुग्रीच्या साह्याने कालव्याची दुरुस्ती करणे क्रमप्राप्त ठरते. परंतु त्यासाठीही प्रसंगी मोठी कुचंबना आणि यातायात होते.दुसरीकडे या कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध होण्यासही मोठा कालापव्यय होतो.त्यामुळे शासकीय निधीची प्रतीक्षा न करता आमदार बोरसे यांनी पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीच कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पदरमोड करण्याची तयारी ठेवली.त्यांनी स्वखर्चातून चार पोकलेन मशीन उपलब्ध करून घेतले असून त्यांच्या साह्याने संपूर्ण कालव्यातील अडथळे दूर करून कालव्याची स्वच्छता केली जाणार आहे.सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे येथील हॉटेल उत्सव गार्डन परिसरात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज पवार,संचालक राकेश देवरे,माजी सभापती कृष्णा भामरे,भाऊसाहेब भामरे,केदा बापू भामरे,पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत पवार,उद्योजक सुरेश पवार,करंजाड सरपंच अरुण देवरे,गोराणे सरपंच डॉ.दिनेश देसले,आखतवाडे सरपंच अशोक खैरनार, आसखेडा सरपंच दीपक कापडणीस,बिजोटे सरपंच पोपट जाधव,अंतापुर सरपंच सुनील गवळी,पारनेर सरपंच रवींद्र देवरे,शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन,भाऊसाहेब अहिरे, सचिन कोठावदे,केवळ देवरे,जाला देवरे,जीवन माळी, निखिल कासारे आदिंसह हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीचे सदस्य,परिसरातील ग्रामस्थ,शेतकरी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
(हरणबारी उजव्या कालव्याच्या ० ते २५ किमी पर्यंतच्या कालव्याच्या विस्तारीकरणासाठी १८ कोटी २६ लाख रुपये खर्चाच्या कामाचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.या कामास लवकरात लवकर निधी प्राप्त होऊन ते प्रत्यक्षात सुरू व्हावे यासाठी आपला शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी वर्गाची गरज पाहता या कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच कालव्याच्या विस्तारीकरणाचे कामही हाती घेण्यात येणार आहे अशी महत्वपूर्ण माहिती यावेळी बोलताना आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.)
(आगामी काळात धरण ओव्हर फ्लो होताच उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येईल. त्यावेळी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कोणताही वादविवाद न करता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून घ्यावे असे आवाहन यावेळी बोलताना आमदार दिलीप बोरसे यांनी केले.शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी आपण आपल्या कार्यकाळात संपूर्ण प्राधान्य दिले असून त्यासाठी शासन स्तरावरूनही भरीव निधी प्राप्त होत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यातील बहुतांशी सिंचन प्रकल्प मार्गी लागतील असा आशावादही यावेळी बोलताना आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केला.)
