तोतया पोलिसांनी मदतीचा बहाणा करून महिलेचे दागिने लांबविले!

नाशिक (प्रतिनिधी): पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविल्याचा प्रकार राजीवनगर भागात घडला. या घटनेत मदतीचा बहाणा करून भामट्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने पळविले असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेगेकिली शकतिवेल नाडार (वय ६६, रा. रघुकुल अपा., डे केअर स्कूलजवळ, चेतनानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नाडार या बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास घर परिसरात फेरफटका मारत असताना ही घटना घडली. राजीवनगर येथील बोरा हॉस्पिटल समोरून त्या पायी जात असताना स्कूटरवर आलेल्या भामट्यांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत पुढे चेकिंग सुरू असून, अंगावरील दागिने काढून ठेवण्याचा सल्ला संशयितांनी दिला. यावेळी मदतीचा बहाणा करून भामट्यांनी नाडार यांच्या गळ्यातील सोनसाखळी, तसेच मंगळसूत्र असा सुमारे १ लाख १२ हजार रुपये किमतीचे दागिने हातचलाखीने लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!