डिझेल चोरी करणा-या टोळीचा केला पर्दाफास; तिघे जेरबंद

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नरसह परिसरात धुमाकूळ घालणा-या डिझेल चोरट्यांचा पर्दाफास करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तीन सदस्यांना जेरबंद करण्यात आले असून संशयितांनी सिन्नर-शिर्डी मार्गावरील शंकरनगर भागातील एचपी पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या बाराचाकी मालट्रकमधून रोकडसह सुमारे २०० लिटर डिझेल आणि सिन्नर, डुबेरेनाका व मुसळगाव एमआयडीसीत उभ्या असलेल्या वाहनातूनही डिझेल पळविल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांच्या ताब्यातून दोन कारसह रोकड असा सुमारे साडेबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून रोहन अनिल अभंग (रा. देवाचामळा, संगमनेर), वैभव बाळासाहेब सुरवडे (रा. जामखेड जि.अहमदनगर) व दादासाहेब दिलीप बावचे (रा. बोधेगाव ता. कोपरगाव ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर समाधान देविदास राठोड (रा. कोपरगाव) व सचिन देविदास डाने (रा. येवला जि. नाशिक हल्ली मु. शिर्डी) हे त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत.
सिन्नरसह मुसळगाव औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेलवर चोरटे डल्ला मारत असल्याची ओरड होती. त्यातच मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री सिन्नर शिर्डी मार्गावरील शंकरनगर भागात असलेल्या एचपी पेट्रल पंपावर उभ्या करण्यात आलेल्या बारा टायर मालट्रकमधून २०० लिटर डिझेल चोरीस गेले. चोरट्यांनी डिझेलसह चालक कॅबीनमध्ये ठेवलेली ३५ हजार रूपयांची रोकडही पळवून नेल्याने याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची अधिक्षक विक्रम देशमाने यांनी गंभीर दखल घेतल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली. स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा चोरट्यांचा माग काढत असतानाच एलसीबीचे अंमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने व अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक निरीक्षक संदेश पवार,जमादार नवनाथ सानप,पोलीस नाईक विनोद टिळे, हेमंत गिलबिले व प्रदिप बहिरम आदींच्या पथकाने केली.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!