नाशिक (प्रतिनिधी): रस्त्यावर पडलेल्या वीस रुपयांची लालसा एका बांधकाम व्यावसायिकास चांगलीच भोवली आहे. पैसे उचलण्याच्या नादात दुचाकीस्वार भामट्यांनी तीन लाखंची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बॅग लिफ्टिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र प्रेमनारायण त्रिवेदी (रा. जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्रिवेदी बांधकाम व्यावसायिक असून, शिखरेवाडीतील स्वामी समर्थ केंद्र परिसरात त्यांची माधुरी निवास नावाची नवीन साइट सुरू आहे. या बांधकाम साइटवर बुधवारी (दि. १८) सकाळी त्रिवेदी मजूरांचा पगार करण्यासाठी आले असताना ही घटना घडली. साइटवर मजूर उपस्थित नसल्याने ते पैशांची बॅग घेऊन आतील बांधकामाची पाहणी करीत होते. यावेळी रस्त्यावरून कुणी तरी त्यांना आवाज दिला. पगार घेण्यासाठी मजूर आले असतील असे समजून ते साइटबाहेरील रस्त्यावर आले. त्यावेळी सामसूम असलेल्या रस्त्यावर २० रुपयांची नोट पडलेली असल्याने ती उचलण्यासाठी त्रिवेदी तेथे गेले. नोट उचलत असताना पाठीमागून भरधाव डबलसीट आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील तीन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी सहायक निरीक्षक बैसाणे तपास करीत आहेत.
