शाळा व महाविद्यालया बाहेरील ३७ टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई
पंचवटी (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून शाळा व महाविद्यालय बाहेर मुलींची छेड काढणारे, दामिनी पथकातील महिला पोलिसांना अरेरावी करणाऱ्या टवाळखोरांची मुजोरी वाढली असल्याचे चित्र होते. याबाबत पोलिसांनी वेळीच लक्ष देण्याची मागणी होत असताना, गुरुवारी (दि.१९) सकाळ पासून पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. पंचवटी पोलीस ठाण्यासह म्हसरूळ, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा महाविद्यालय बाहेर टवाळखोरी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दंडुका दाखवला. परिमंडळ १ मध्ये गुरुवारी (दि.१९) ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या पंचवटी, आडगाव व म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच दामिनी पथकातील महिला अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या पथकांनी सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या कालावधीत शाळा, कॉलेज बाहेर जावुन तेथील विनाकारण फिरणारे, स्टंटबाजी करणारे, मुलींची छेड काढणारे टवाळखोरांना ताब्यात घेवुन, त्यांना पोलीस ठाण्यात आणुन त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित शाळा कॉलेजेसचे प्रिन्सिपल यांच्या भेटी घेवुन त्यांच्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०, म्हसरूळ १२ तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे.