नाशिक जिल्ह्यातील ९६ तलाठी शासन सेवेत तर १५९ प्रतिक्षा यादितच!

जगदिश वाघ,
नाशिक : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तलाठी भरती प्रक्रियेतील नाशिक जिल्ह्यातील १७३ पैकी ९६ तलाठ्यांना गुरुवारी (दि. १) नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. बिगर पेसा क्षेत्रातील हे तलाठी प्रथमत: नियुक्त केले जातील. उर्वरित ६७ तलाठ्यांची समांतर आरक्षणामुळे नियुक्ती रखडली आहे; तर १० उमदेवारांना जिल्हा समितीने अपात्र ठरविले असून, १५९ उमेदवारांची प्रतीक्षा यादीही जाहीर केली आहे.
संपूर्ण राज्यात ४४४६ पदांची मेगाभरती २०२२-२३ मध्ये जाहीर झाली. त्यानंतर परीक्षा पार पडली. नाशिक जिल्ह्यात १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या दरम्यान परीक्षा झाली. ११ मार्च २०२४ रोजी सुधारित गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्याचवेळी संपूर्ण राज्यातील निवड आणि प्रतीक्षा यादीही जाहीर झाली. त्यानंतर पेसा वगळून इतर क्षेत्रांतील जागांवर नियुक्ती देण्यास कुठलीही अडचण नसताना आणि उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असतानाही अद्याप त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. या विरोधात निवड यादीतील उमेदवारांनीच आवाज उठविण्यास सुरुवात केली. दि. २४ जून रोजी मॅटने १३ पेसा जिल्ह्यातील पेसा क्षेत्र वगळून इतर जागांवरील स्टेटस को उठविला आहे. त्यात नाशिक जिल्हाही समाविष्ट असल्याने त्वरित नियुक्तीचा हेका त्यांनी लावून धरल्यानंतर लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर पुन्हा विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक यांच्या आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला होता. आता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेताना पात्र ठरलेल्या बिगर पेसा क्षेत्रातील ९६ उमेदवारांना गुरुवारी नियुक्ती दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!