तुषार रौंदळ,
सटाणा : आठवड्या भरापासून शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने पुनद योजनेच्या भरवश्यावर जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सटाणा शहरावर पाणी संकट ओढवले आहे. यास जबाबदार कोण असा प्रश्न माजी पाणीपुरवठा सभापती व शिवसेना उबाठा गटाचे जेष्ठ नेते अरविंद सोनवणे यांनी उभा केला असून सटाणा शहराला गिरणा पात्रातून एक दिवसाआड सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा सुरू होता. करोडो रूपये खर्च करून गिरणा पात्रात पाणीपुरवठ्यासाठी विहीरी खोदल्या गेल्या त्यावर महागड्या मोटारी बसवून शहराला पाणी पोहोच केले जात होते. त्यातच एक विहीर खचल्याने तिचा काही दिवसासाठी पाणीपुरवठा बंद होता. अशातच पुनद योजना अस्तित्वात आली आणि शहर वासीयांचा पाणी प्रश्न मिटणार यामुळे आशा पल्लवीत झाल्या. ५३ कोटी रूपये खर्च करून पुनद योजनेचे काम पुर्ण करण्याचा प्रयत्न झाला. घाई घाईत पुनद पाण्याचे जलपुजनही करण्यात आले. मात्र शहराला पुनदचे मुबलक व सुरळीत पाणी मिळू शकले नाही ही शोकांतीकाच राहिली.
पुनद योजना सुरू झाल्यानंतर गिरणा नदी पात्रातील जुन्या योजनेकडे पालिका प्रशासनाचे विषेश दुर्लक्ष झाले. गिरणा नदी पात्रातील पाणीपुरवठा योजनेकडे कानाडोळा केल्यामुळे त्या नादुरुस्त झाल्या. पुनद धरणातील पाणीसाठा संपला तर जुन्या विहीरींमधील पाणी शहराला देता येईल याचा विसरच प्रशासनाला पडल्यामुळे आज पुनद धरणात पाणीसाठा शिल्लक नाही आणि गिरणा नदी पात्रातील विहीरीवरील मोटारींची दुरुस्ती व देखभाल न झाल्यामुळे विहीरीमध्ये पाणी असतानाही शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. ही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
गिरणा नदी पात्रातील एका विहीरीतून ५० लाख लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यातून शहरवासीयांची तहान निश्चित भागू शकते. मात्र पालिका प्रशासनाने पुनद योजनेच्या भरवशावर जुन्या गिरणा नदी पात्रातील पाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरात पाणीटंचाई भासत असल्याचे पालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती अरविंद सोनवणे सांगतात, पालिका प्रशासनाने पुनद योजनेच्या भरवशावर न राहता शहराचा विस्तार बघता, गिरणा नदीतील जुण्या योजनेचीही देखभाल दुरूस्ती करून पर्यायी व्यवस्था ही असू द्यावी अशी मागणीही सोनवणे यांनी केली आहे.
