सटाणा शहाराच्या बाह्य वळण (बायपास) रस्त्याचे काम मार्गी लावा : दीपिका चव्हाण

सटाणा (प्रतिनिधी): सटाणा शहरवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा व संवेदनशिल असणारा बाह्य वळण (बायपास) रस्त्यासाठी अद्यापही भुसंपादनाचा प्रस्ताव सादर झालेला नसून केंद्र शासनाने घोषणा करूनही या वळण रस्त्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही. या महामार्गावर होणार्‍या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जनतेची सुरक्षितता धोक्यात आहे.

केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून तत्काळ शहाराच्या बाह्य वळण (बायपास) रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी नवनिर्वाचित खासदार डॉ.शोभाताई बच्छाव यांच्याकडे केली आहे. माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी आपल्या संपर्क कार्यालयात निवडीनंतर पहिल्यांदाच बागलाण तालुका दौर्‍यावर आलेल्या धुळे लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ.बच्छाव यांचे स्वागत केले. यावेळी सौ.चव्हाण यांनी खासदार डॉ.बच्छाव यांना निवेदन देऊन या विषयावर चर्चा केली. सटाणा शहरातून जाणार्‍या राज्य महामार्गास केंद्र शासनाने दि.३ जानेवारी २०१७ रोजी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा बहाल केला होता. गुजरात राज्याला जोडणारा हा सर्वात जवळचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सटाणा शहरात दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांना जीव मुठीत धरुन या महामार्गाने ये-जा करावी लागते.

शहरात या महामार्गावर शाळा, महाविद्यालये, दवाखाने, बँका, व्यापारी प्रतिष्ठाणे, शासकीय कार्यालये, हॉटेलस् असल्याने दररोज हजारो नागरीक व विद्यार्थ्यांचा महामार्गावर मोठा वावर असतो. यापुर्वी या महामार्गावर अनेकवेळा लहान मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे शहरासाठी बाह्य वळण रस्ता व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सटाणा शहरातील नागरीकांकडून लोकप्रतिनिधींकडे सातत्याने केली जात आहे. परंतु, कुठलीही कार्यवाही होत नसल्याने जनतेमध्ये केंद्र सरकार व लोकप्रतिनिधींबद्दल मोठी नाराजी आहे.
केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमातील आपल्या भाषणात, सटाणा शहर वळण रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र केंद्र शासनाकडून पुढे सटाणा शहराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी काहीही झालेले नाही. तत्कालीन खासदार डॉ.सुभाष भामरे यांनीही सटाणा शहर बाह्य वळण रस्त्याचा प्रस्ताव परिवहन मंत्रालयाच्या स्थायी आर्थिक समितीमध्ये (स्टँडींग फायनान्स कमिटी) समाविष्ठ करून १२.८० किलोमीटर लांबीचा रु.७० कोटींचा भुसंपादनाचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन सटाणा शहरातील जनतेला दिले होते. परंतु, आजपर्यंत या कामासाठी कुठलीही तरतुद झाली नसल्याचे समजते.
शहराची वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात वाढलेली अवजड वाहतुक यामुळे सटाणा शहरातील जनतेसाठी बाह्य वळण (बायपास) रस्ता हा अत्यंत जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय झाला आहे. त्यामुळे शहर बाह्य वळण रस्ता त्वरीत होणेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्फत योग्य तो पाठपुरावा करून या बाह्य वळण रस्त्याचे काम त्वरीत मार्गी लावावे, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी खासदार डॉ.बच्छाव यांच्याकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!