नाशिक (प्रतिनिधी): शहरात घरगुती गॅसचा राजरोसपणे वाहनासांठी वापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांच्या छाप्यात, सिलिंडरचा साठा बाळगणारा हाती लागल्याने वितरण व्यवस्थेतील गॅस चोरी चर्चेत आली आहे. या सिलिंडर्समधील गॅसचा वाहनांना पुरवठा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. संशयिताच्या ताब्यातून गॅस भरण्याचे कॉम्प्रेसर मशीन व २४ सिलिंडर्स हस्तगत करण्यात आले असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
सातपूर येथील नंदिनी नदीच्या किनारी घरगुती वापराच्या सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या वाहनांमध्ये गॅस भरून दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत युनिट २ च्या पथकाला निनावी पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार बुधवारी (दि. २६) पोलिसांनी छापा टाकला असता, परिसरातील एका गोठ्याजवळ शेखर रमेश विसपुते (रा. मयूरेश्वर अपा., गणपती मंदिराजवळ, अशोकनगर) याच्या ताब्यात सिलिंडर्स व तीन पिस्टन कॉम्प्रेसर मशीन्स आढळून आले. या ठिकाणी कॉम्प्रेसरच्या माध्यमातून सिलिंडरमधील गॅस वाहनामध्ये भरला जात होता. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजेंद्र घुमरे, विवेकानंद पाठक, हवालदार गुलाब सोनार, मनोहर शिंदे, संजय सानप, वाल्मिक चव्हाण, चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, परमेश्वर दराडे, प्रकाश महाजन, अंमलदार स्वप्निल जुंद्रे, समाधान वाजे, तेजस मते, प्रवीण वानखेडे, विशाल कुवर, तेजस मते आदींच्या पथकाने केली.
