- मंगेश ताकाटे,
नाशिक: कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ही प्रवेशाची प्रक्रिया संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या समोरच स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या कोर्सच्या जागांचीही माहिती मिळत असल्याने त्यातून होणारी जागांची लपवाछपवी टळेल. विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांतून हवा तो ट्रेड निवडण्याचेही स्वातंत्र्य संचालनालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना नेटद्वारे करता येणार आहेत.
शासकीय आयटीआयच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. सविस्तर वेळापत्रकही जाहीर झाले असून, दि. ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश दिले जाणार आहे. ४ फे-यांमध्ये समुपदेशनाद्वारे ही प्रक्रिया राबविली जाईल. राज्यभर एकाच वेळी प्रवेश दिले जाणार असून, नाशिक विभागात ३० हजार ८१६, तर जिल्ह्यात ८६३६ इतक्या जागा यंदा प्रवेशासाठी उपलब्ध आहे.
प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ८० असून, त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेइकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटेर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यांसारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच गतवर्षी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर, तसेच ड्रोन टेक्निशियन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.
