अंबड परिसरातील सिद्धटेक नगर येथे पाच लाखांची घरफोडी

अंबड (प्रतिनीधी) : ड्रायव्हरची नोकरी, त्यात भाडे तत्वावरील घरात राहत असल्याने परिस्थितीवर मात करत हक्काचे घर व्हावे म्हणून नातलगांच्या सहकार्याने जमवलेल्या सुमारे पाच लाखांच्या पुंजीवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे गृहस्वप्न साकार होण्याचे स्वप्न भंगलेच शिवाय नातेवाईकांकडून घेतलेली उसनवारी देखील परत लागणार आहे. घरफोडीमुळे अंबड परिसरातील सिद्धटेक नगर येथील राम किसन पाळदाते यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धटेक नगरमध्ये राम पाळदाते हे सप्तशृंगी अपार्टमेंटमध्ये भाडेतत्वावर राहतात. घर घेण्यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून ३ लाख ८० हजार रुपये उसने आणले होते. ही सर्व रक्कम घरातील कपाटात ठेवली होती. त्यात सोन्या-चांदीचे दागिन्यांचा देखील समावेश होता. त्यातून त्यांना घर खरेदी करायचे होते. या दरम्यान मुलीला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने घरातील व्यक्ती नातेवाईकांकडे गेले. पाळदाते हे चालकाची नोकरी करत असल्याने ते बाहेरगावी असत. यामुळे घर कायम बंद दिसत होते. ११ जून रोजी त्यांना बिल्डिंगमधून फोन आला की तुमचा घराचा दरवाजा उघडा आहे. सर्व सामान अस्थव्यस्थ पडले आहे. त्यांनी त्वरीत घरी येत पाहिले तर अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे तीन लाख ८० हजार रुपयाची रोकड व दागिने असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पाळदाते यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक झनसिंग घुनावत करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!