नाशिक (प्रतिनिधी): नाशिक तालुका पो.स्टे. व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाची संयुक्त कामगिरीत दि. २२/०२/२०२५ रोजी रात्रौ २०:३५ चे सुमारास नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत गोवर्धन गावात, राजीवगांधी नगरमध्ये फिर्यादी किशोर जाधव, हे त्यांचे संपर्क कार्यालयासमोर बसलेले असतांना आरोपी नामे १) तुषार कापसे, २) रोशन जाधव, ३) राहुल जाधव, ४) अजय कापसे, ५) बाळा माडे व इतर संशयीतांनी दि. २१/०२/२०२५ रोजी झालेल्या भांडणाचे कारणावरून कुरापत काढुन शिवीगाळ करून, यातील आरोपी रोशन जाधव याने फिर्यादीवर पिस्तुल रोखुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्तुलातून गोळी धाडणार, तितक्यात फिर्यादीने आरोपीचे हातातील पिस्तुलला खालच्या बाजुन जोरात वर केल्याने पिस्तुल मधील गोळीचा हवेत बार झाला, तसेच यातील इतर आरोपीतांनी हातातील तलवारीचा धाक दाखवुन सर्वांनी शिवीगाळ दमदाटी केली म्हणुन नाशिक तालुका पोलीस ठाणेस गुरनं २६/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०९, १८९ (२), १९१(२) (३), ३५२, ३५१ (२) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांनी सदर प्रकरणातील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक तालुका पोलीसांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी त्यांचे पथकांना आरोपींचा पुर्व इतिहास व त्यांचे सध्याचे ठावठिकाणाबाबत माहिती काढण्यासाठी सुचना केल्या. त्याप्रमाणे स्थागुशाचे सपोउनि नवनाथ सानप व नाशिक तालुका पो.स्टे.चे पोहवा/शितलकुमार गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी वरून यातील आरोपी नामे १) रोशन दिलीप जाधव, वय २४, रा. धर्माजी कॉलनी, रो-हाउस नं. १, शिवाजीनगर, नाशिक, २) तुषार विठ्ठल कापसे, वय २१, रा. राजीवगांधी नगर, गोवर्धन, ता. जि. नाशिक, ३) गौरव उर्फ बाळा जयराम माडे, वय २१, रा. राजीवगांधी नगर, गोवर्धन, ता. जि. नाशिक, ४) अजय मनोज कापसे, वय २१, रा. राजीवगांधी नगर, गोवर्धन, ता.जि. नाशिक यांना पाथर्डी फाटा व अंबड परिसरातुन शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेतले. सदर आरोपीतांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचे कब्जातून गुन्हयात वापरलेले ०१ देशी बनावटीचे पिस्तुल, ०१ तलवार, ०१ धारदार चाकु, व गुन्हा केल्यानंतर पळुन जाण्यासाठी वापरलेली सफेद रंगाची हुंयदाई आय.२० कार क. एम.एच.०१.बी.जी.६५३५ ही जप्त करण्यात आली आहे. वरील आरोपी क्र. १ ते ४ यांना नाशिक तालुका पो.स्टे. कडील गुन्हयात अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहे. यातील आरोपीतांविरूध्द यापुर्वी नाशिक शहर हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सपोनि दिलीप खेडकर, सपोनि संदेश पवार, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, नंदु वाघ, शितलकुमार गायकवाड, विनोद टिळे, संदिप नागपुरे, दिपक पाटील, मंगेश पानझडे, निलेश मराठे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.
