नाशिक शहरात घरफोडीचे सत्र सुरूच!

तीन वेगवेगळ्या भागात पावणेचार लाखांचा ऐवज लंपास

नाशिक (प्रतिनिधी): शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, वेगवेगळ्या भागात नुकत्याच झालेल्या तीन घरफोड्यांत चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. यात एका भरदविसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून, या घटनांमध्ये रोकडसह सोने चांदीचे दागिने व लॅपटॉप चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी म्हसरूळ व उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील यश पांडुरंग झगरे (वय २०) हा महाविद्यालयीन विद्यार्थी स्नेहनगर भागात वास्तव्यास आहे. रविवारी (दि. १३) दुपारी तो शिकवणीसाठी घराबाहेर पडला असतात्याच्या निवासस्थानी चोरी झाली. अज्ञात चोरट्यानी भरदिवसा झगरे याच्या पुष्पक अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या बाहेर बुटात ठेवलेली चावी घेऊन बेडरूममधील कपाटात ठेवलेला सुमारे ७० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला.
दुसरी घरफोडी याच परिसरातील मानेनगर भागात घडली. सोनल विनयाक लाटे (रा. रघुकुल रो-हाऊस, मानेनगर, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. लाटे कुटुंबीय रविवारी (दि. १३) बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून कपाटात ठेवलेली दोन लाखांची रोकड व चांदीचे पैंजण आणि बाजूबंद असा सुमारे २ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, अधिक तपास हवालदार वसावे व उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.
तिसरी घटना जय भवानी रोड भागात घडली.याप्रकरणी शकिला बानू अब्दुल शेख (रा. आदित्य रो-हाउस, आडकेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शेख कुटुंबीय गेल्या शनिवारी (दि. ५) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद रो-हाउसच्या खिडकीचे गज कापून घरामध्ये प्रवेश करीत बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली सात हजारांची रोकड व सोने चांदीचे दागिने असा सुमारे ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!