नाशिक (प्रतिनिधी): पूर्ववैमनस्यातून हल्ला करीत तरूणाचा खून केल्याप्रकरणी सात जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना पेठ रोडवरील फुलेनगर भागात घडली होती. या घटनेत मृताचे दोन मित्रही जखमी झाले होते. हा खटला कोर्ट क्र . ८ चे न्या. जे. एम. दळवी यांच्या समोर चालला.
जयराम नामदेव गायकवाड (वय ४४, रा. लक्ष्मणनगर, तेलंगवाडी), दशरथ नामदेव गायकवाड (वय २४), श्रीराम नामदेव गायकवाड (वय ३६), सूरज जयराम गायकवाड (वय १९), अंबिका अर्जुन पवार (वय २८, सर्व रा. वैशालीनगर, पेठरोड), संदीप चंद्रकांत पवार (वय २५, रा. अश्वमेधनगर, पेठरोड) व राहुल चंद्रकांत पवार (वय १९, रा. देवळाली गाव बाजारपट्टी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सुनील सुखलाल गुंजाळ (वय २१, रा. वैशालीनगर, पेठरोड) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी सुनील गुंजाळ, त्याचा भाऊ अनिल गुंजाळ, सागर माने व दीपक कोरडे आदी मित्र दि. १३ जून २०१८ रोजी फुलेनगर परिसरातील लक्ष्मणनगर येथे गप्पा मारत उभे असताना टोळक्याने गुंजाळ बंधंूसह त्यांच्या दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत अनिल गुंजाळ याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला होता; तर माने आणि गोराडे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खून, प्राणघातक हल्ला व विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन निरीक्षक विजय ढमाळ यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप न्यायालयात सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय क्र.८ चे न्या.जे.एस.दळवी यांच्या कोर्टात चालला. सरकारतर्फे अड.एस.एस.गोरवाडकर व डॉ.सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेल्या साक्षीपुराव्यास अनुसरून सर्व आरोपींनी वेगवेगळ्या कलमान्वये दोषी ठरवत जन्मठेप व एकत्रित ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
