तुषार रौंदळ
सटाणा (प्रतिनिधी) : ता. बागलाण मधील ढोलबारे शिवारात विनापरवाना गौण खनिज (मुरूम, माती, दगड) उत्खणन आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीच्या साहाय्याने उत्खणन सुरू होते. मात्र संबंधित महसूल प्रशासनाला याची कल्पना नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बेकायदेशीर उत्खणनाची माहिती मिळताच ढोलबारे येथील उपसरपंच भिला ठोंबरे व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोकलेन मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती काढली जात असल्याचे आढळले. खडी क्रेशर आणि ट्रॅक्टर-डंपरच्या माध्यमातून सदर गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याचेही निदर्शनास आले. प्रकरणाची माहिती रिपब्लिकन सेना चे प्रवक्ते प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांना या उत्खणनाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
काही तासांनी मंडळ अधिकारी शिरसाठ व तलाठी कापडणीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून पंचनामा केला. कोणताही अधिकृत परवाना सादर करण्यात न आल्याने हे उत्खणन बेकायदेशीर असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. पंचनाम्यानुसार अंदाजे १०० ब्रास गौण खनिजाचे उत्खणन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान खालील यंत्रसामग्री व वाहने आढळून आली: एक पोकलेन (TATA HITACHI), तीन खडी क्रेशर, दोन स्वराज ट्रॅक्टर, दोन पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर, एक टाटा डंपर सदर वाहनांच्या मालकांना विनापरवाना उत्खणन व वाहतूक केल्याबाबत समज देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले उत्खणन प्रशासनाच्या नजरेतून सुटते कसे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पंचनाम्यानंतर यंत्रसामग्री तात्काळ जप्त का करण्यात आली नाही? संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास विलंब का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
बागलाण प्रांतातील गड-किल्ले आणि डोंगररांगा यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडलेला आहे. त्यामुळे या भागातील डोंगरांचे विद्रूपीकरण होणे गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. अवैध उत्खणनामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता असून, शेती आणि पाणीपातळीवरही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. “बेकायदेशीर उत्खणन करून डोंगररांगा आणि ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी दिला. कारवाईवेळी दावल महादू पांडोळे, भिला काशिनाथ ठोंबरे, प्रा. अमोल बच्छाव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून यंत्रसामग्री जप्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
