नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्याने छोट्या बालिकेवर हल्ला केल्याचे लक्षात येताच तिच्या आईने हातातील विळ्याच्या मदतीने लेकीची बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली. या हल्ल्यात आठवर्षीय बालिका जखमी झाली असून, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर गुंजन शिंदे ही बालिका द्राक्षबागेत काम करणाºया आपल्या आईकडे जात होती. त्यावेळी जवळच टोमॅटोच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक गुंजनवर हल्ला करीत तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. हे भयंकर दृश्य पाहून गुंजनच्या आईने हातात विळा घेऊन बिबट्याकडे धाव घेतली. तिला पाहताच बिबट्याने तोंडात पकडलेल्या गुंजनला सोडून देत उसाच्या शेताकडे पळ काढला. मात्र, या हल्ल्यात गुंजनच्या मानेला दोन दात लागून मोठी जखम झाल्याने तिला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात येऊन तेथे प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एकीकडे गुंजनवरील बिबट्याच्या हल्ल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे, तिच्या आईने केलेल्या धाडसाचे कौतुकही होत आहे.
