नाशिक (प्रतिनिधी): निफाड येथून देवदर्शन करून नाशिकला परतणा-या भाविकांच्या वाहनाला शहरातील द्वारका परिसरात उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून, सात जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी (दि. १२) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना भाविकांचे वाहन त्यांच्या पुढे लोखंडी सळई घेऊन जात असलेल्या आयशरवर धडकल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत व जखमी हे शहरातील सिडको परिसरातील असल्याचे समजते.
मुंबईच्या दिशेने जाणा-या चारचाकी वाहनाने लोखंडी सळया घेऊन जाणा-या आयशरला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास चारचाकी वाहन (क्र. एमएन १५ एफव्ही ५६०१) हे पिंपळगावकडून मुंबईच्या दिशेने उड्डाण पुलावरून जात होते. द्वारका परिसरात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात या वाहनाने समोरील आयशर (क्र. एमएच २५ यू ०५०८) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे समोरील वाहनातील लोखंडी सळया ओव्हरटेक करणा-या या वाहनात शिरल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहे. आजूबाजूच्या वाहनचालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत, जखमींना वाहनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तसेच बाहेर काढलेल्या जखमींना उपचारासाठी दाखल केले. याचवेळी द्वारका चौकात कर्तव्यावर असलेल्या भद्रकाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण अपघातामुळे पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. जखमींना उपचारासाठी दाखल केल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
मयत आणि जखमींची नावे
अपघातातील मयत आणि जखमी हे शहरातील सिडको परिसरातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरटे, यश खरात, चेतन पवार यांचा समावेश आहे. जखमींमध्ये समीर गवई, विद्यानंद (पूर्ण नाव माहित नाही), मकरंद आहेर, प्रेम मोरे, कृष्णा भगत, साई काळे, लकी सोनवणे आदींचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त समजताच सिडको परिसरावर शोककळा पसरली.
