घाट रस्त्यागड रस्त्यावर जाळी बसविण्याचे काम पूर्ण सप्तशृंग गडावर वाहतूक सुरु

कृष्ण पैठणे,
वणी (प्रतिनिधी): सप्तशृंग गड विकास आराखडा योजनेतून गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेले, सप्तशृंग गड ते नांदुरी घाट रस्त्याच्या कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे नांदुरी ते सप्तशृंग गड घाट रस्ता शुक्रवार (दि. १०) पासून भाविकांना वापरण्यासाठी पूर्ववत होणार आहे.
सप्तशृंग गडावर जाण्यासाठी नांदुरी ते गड ९ किलोमीटर घाट रस्त्याने भाविकांना प्रवास करावा लागतो. गेल्या काहीवर्षांत या घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठे दगड पडून रस्ता बंद होण्याचे प्रमाण अनेकदा झाले. यामध्ये काही भाविकांच्या वाहनांचेही नुकसान झाले. महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग गडावर दररोज भाविकांची संख्या वाढतेच आहे. या गोष्टीचा विचार करुन सप्तशृंगी ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने घाट रस्त्याला दरड प्रतिबंधक जाळी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार, शासनाने या कामासाठी ३३ कोटी रुपये मंजूर केले. या कामाला २३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सुरुवात झाली होती. यानंतर नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ, नवीन वर्ष यादरम्यान कामबंद ठेवण्यात आले होते. याशिवाय इतरवेळी सकाळी ६ ते साडेअकरा वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत होता. यामुळे गडावर भाविकांची संख्या मोठ्याप्रमाणात कमी झाली होती. मात्र, रॉकफॉल प्रोटेक्शनचे काम पूर्ण झाले असून आज शुक्रवार (दि.१०) पासून सप्तशृंग गड ते नांदुरी घाट रस्ता पूर्ववत करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना २४ तास कधीही या रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करता येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
रॉकफॉल प्रोटेक्शनचे काम करतांना संपूर्ण घाट रस्त्याची पाहणी करण्यात आली. यानंतर डोंगरावर असलेले सैल दगड काढून टाकण्यात आले. यानंतर डोंगराच्या मध्यापासून रस्त्याच्या काठापर्यंत दरड प्रतिबंधक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. जेणेकरून पावसाळ्यात, उन्हाळ्यात सैल झालेले दगड खाली आले तर ते दगड जाळीमध्ये अडकतील किंवा रस्त्याच्या कडेला पडतील, कुठलीही जिवित वा वित्तहानी होणार नाही. यामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल.
रोहिणी वसावे, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!