सुधारित आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

नाशिक : कर चुकवेगिरी, चुकीचे उत्पन्न दाखवणे, बनावट खर्च व बोगस रिफंड क्लेम करणाऱ्या करदात्यांविरोधात आयकर विभागाने कडक भूमिका घेत तपासणी मोहीम तीव्र केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी दाखल करण्यात आलेल्या आयकर विवरणपत्रांची (ITR) सध्या देशभरात जलद गतीने पडताळणी सुरू असून संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) मिळालेल्या माहितीनुसार, अनेक करदात्यांच्या आयकर विवरणपत्रांमध्ये उत्पन्नाची माहिती, खर्चाचे दावे, सूट व वजावट, तसेच रिफंडच्या रकमांमध्ये गंभीर विसंगती आढळून आली आहे. आयकर विभागाकडे उपलब्ध असलेला फॉर्म २६AS, AIS (Annual Information Statement), TIS (Taxpayer Information Summary) यातील माहिती आणि दाखल केलेल्या रिटर्नमधील आकडे जुळत नसल्याने संबंधित आयटीआर प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.

थेट दंडात्मक कारवाई न करता आयकर विभागाने प्रथम टप्प्यात करदात्यांना स्वतःहून चुका दुरुस्त करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित करदात्यांना एसएमएस, ई-मेल तसेच आयकर पोर्टलवरील नोटिफिकेशनद्वारे सूचना पाठवण्यात येत आहेत. करदात्यांनी आपले विवरणपत्र पुन्हा तपासून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करावीत व चुकीचे दावे दुरुस्त करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

३१ डिसेंबरपर्यंत सुधारित रिटर्न दाखल करण्याची अंतिम संधी

आयकर कायद्यानुसार सुधारित आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत करदात्यांनी सुधारित रिटर्न न भरल्यास आयकर विभागाकडून पुढील तपासणी, नोटीस, दंड तसेच व्याजासह कर वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेत सुधारित रिटर्न दाखल न केल्यास करदात्यांना आर्थिक नुकसानासोबतच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागू शकते.

१५ लाखांहून अधिक करदात्यांनी सुधारित रिटर्न दाखल

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात १५ लाखांहून अधिक करदात्यांनी मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी सुधारित आयकर रिटर्न दाखल केले असून त्यातून सुमारे २,५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. यामुळे आयकर विभागाच्या तपासणी मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

बोगस रिफंड, चुकीच्या सूट-दाव्यांवर विशेष लक्ष

आयकर विभागाने विशेषतः बनावट खर्च दाखवणे, खोट्या दान पावत्या, बनावट गृहकर्ज व्याज, तसेच जास्तीचे रिफंड मिळवण्यासाठी केलेल्या गैरप्रकारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. करदात्यांनी दलाल किंवा अनधिकृत सल्लागारांच्या भूलथापांना बळी न पडता स्वतःची कर माहिती अचूक तपासूनच रिटर्न दाखल करावा, असा सल्लाही विभागाकडून देण्यात आला आहे.

करदात्यांना आवाहन

आयकर विभागाने करदात्यांना आपल्या आयटीआरमधील सर्व माहिती AIS व २६AS शी जुळवून पाहण्याचे, आवश्यक असल्यास तज्ज्ञ सल्ला घेण्याचे आणि अंतिम मुदतीआधी सुधारित रिटर्न दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

“सध्या सर्वच आर्थिक व्यवहार पॅन कार्डशी लिंक असल्याने आयकर विभागाची करडी नजर असते, करदात्याने उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती आयटीआर मध्ये दाखवली नाही; चुकीच्या पद्धतीने कर सवलत, वजावट बोगस रिफंड क्लेम केले असल्यास हे कर चोरीचं प्रकरण समजलं जाते. अशा वेळी तुम्ही कर भरण्यापासून सुटका करून घ्याल; मात्र, भविष्यात तुम्ही अधिक अडचणीत येऊ शकता व आर्थिक भुर्दंड होऊ शकतो. सुधारित रिटर्न भरताना उत्पनाचे सर्व स्रोत व आर्थिक व्यवहाराची अचूक माहिती देऊन कर, व्याज/दंड भरून चिंतामुक्त होणे यातच शहाणपण आहे.”

योगेश भास्कर कातकाडे, कर सल्लागार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!