तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी):
सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग (जी–७५३) च्या अत्यंत रखडलेल्या व निकृष्ट कामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवार (दि. २६ डिसेंबर) रोजी छेडण्यात येणारे रास्ता रोको व बेमुदत उपोषण आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असल्याची माहिती बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिली. तहसीलदार कैलास चावडे यांनी दि. १ जानेवारी २०२६ रोजी महामार्गाच्या प्रलंबित कामासंदर्भात सर्व संबंधित शासकीय यंत्रणांची विशेष व निर्णायक बैठक बोलावल्याने प्रशासनाला ही अखेरची संधी देण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, या बैठकीतून ठोस, वेळबद्ध निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
गेल्या तीन वर्षांपासून सटाणा शहरातून जाणारा साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः मृत अवस्थेत असून ठिकठिकाणी पडलेले प्रचंड खड्डे, वाहतुकीदरम्यान उडणारी धूळ, रस्त्यावर साचलेली माती आणि अपूर्ण कामामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन असह्य झाले आहे. महामार्गावर वारंवार अपघात घडत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका सेवा, दुचाकीस्वार व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाढती धूळ व प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांचे विकार व आरोग्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे.
अनेक वेळा निवेदने देऊन, आंदोलने करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व संबंधित यंत्रणांकडून केवळ आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्ष काम मात्र सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या संयुक्त वतीने माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, केशव मांडवडे, शहराध्यक्ष भारत काटके, मनोज सोनवणे, संदीप भामरे, किशोर ह्याळीज आदी पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको व बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना लेखी निवेदन देत प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेर प्रशासन हालचालीत आले असून तहसीलदार कैलास चावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दि. १ जानेवारी रोजी सटाणा तहसील कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस सर्व संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत महामार्गाच्या कामाचा आढावा घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहे.
मात्र, ही बैठक केवळ औपचारिक ठरू नये, अशी ठाम भूमिका माजी आमदार संजय चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. “फक्त बैठक, चर्चा आणि आश्वासने देऊन नागरिकांची फसवणूक आता खपवून घेतली जाणार नाही. वेळापत्रकासह प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
“सटाण्याचा राष्ट्रीय महामार्ग हा नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा झाला आहे. तीन वर्षे प्रशासन झोपेत होते. आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका व नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून ते फक्त तूर्त स्थगित केले आहे. १ जानेवारीच्या बैठकीत ठोस निर्णय, स्पष्ट वेळापत्रक आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय राहणार नाही. ही लढाई राजकीय नसून सटाणा शहराच्या अस्तित्वाची लढाई आहे.”
— संजय चव्हाण, माजी आमदार, बागलाण
