आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास ‘रास्ता रोको’ व उपोषणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
तुषार रौंदळ | सटाणा : सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग (जी–७५३) वरील काँक्रीटीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णतः ठप्प असून त्यामुळे हा महामार्ग आता अपघातांना आमंत्रण देणारा मृत्यूचा सापळा ठरत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या महामार्गावर दिवसभर उडणारी प्रचंड धूळ, ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे वाढत चाललेले प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संयम संपत चालला असून राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. बसस्थानक ते जिजामाता उद्यान व कंधाणे फाट्यापर्यंतच्या महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम येत्या आठ दिवसांत तात्काळ सुरू न झाल्यास शुक्रवार, दि. २६ रोजी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून उपोषण छेडण्यात येईल, असा संतप्त इशारा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्फे संयुक्त निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांना निवेदन, काम तातडीने सुरू करण्याची मागणी
या मागणीसंदर्भात माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शहरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाची सविस्तर माहिती देत रखडलेल्या कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
अर्धवट कामामुळे वाढले संकट
ताहाराबाद रस्ता ते बसस्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील बसस्थानक ते जिजामाता उद्यान या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातील काम अचानक थांबविण्यात आले. याच मार्गावरून शहरातील मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि ग्रामीण भागातील वाहतूक सतत सुरू असते. मात्र महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, उघडे डांबराचे तुकडे, दगड व गुडघाभर साचलेली धूळ यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
धुळीमुळे आरोग्य धोक्यात
दिवसभर उडणाऱ्या धुळीचे ढग दुकाने, घरे, शाळा आणि रुग्णालयांमध्ये शिरत असून नागरिकांना श्वसनाचे विकार, दमा, खोकला, डोळ्यांची जळजळ, ऍलर्जी आणि त्वचारोगांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना याचा अधिक फटका बसत आहे.
व्यापारी व व्यावसायिक अडचणीत
धुळीमुळे दुकानातील अन्नधान्य, कापड व इतर साहित्य खराब होत असून ग्राहक दुकानात येण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी व्यापाऱ्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल व्यवसाय, फळविक्रेते व हातगाडा व्यावसायिक यांनाही आर्थिक फटका बसत आहे.
वाहतूक कोंडीमुळे आपत्कालीन सेवा ठप्प: महामार्गावर सकाळ-संध्याकाळ तासनतास वाहतूक कोंडी होत असून अनेक वेळा रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे. आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत असल्याचे चित्र आहे.
आंदोलनाचा इशारा: यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, केशव मांडवडे, भारत काटके, मनोज सोनवणे, दिनेश सोनवणे, फईम शेख, अशोक भामरे, अनिल पाटील, किशोर ह्याळीज, रणधीर मोरे, मुन्ना शेख, मुन्ना मांडवडे, विलास सोनवणे, स्वप्नील सोनवणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शहर धुळीत गुदमरत असताना अधिकारी शांत बसलेले आहेत. बसस्थानक ते जिजामाता उद्यान व कंधाणे फाट्यापर्यंत महामार्गाचे काम थांबवून नागरिकांना धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या नरकयातना दिल्या जात आहेत. आठ दिवसांत काम सुरू झाले नाही तर सटाणा बंद पाडण्याची ताकद नागरिकांमध्ये आहे,”
— संजय चव्हाण, माजी आमदार, बागलाण
