अवकाळी पाऊस व गारपिटीने बागलाण हादरले; दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या मदतीची मागणी

तुषार रौंदळ, सटाणा: बागलाण तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व तीव्र गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजावर मोठे संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी तसेच विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. तालुक्यातील दरेगाव, नांदीन, तांदुळवाडी, पिंपळकोठे, ताहराबाद, अंतापूर, कोटबेल, पारनेर, निताणे, बिजोटे, ब्राह्मणगाव, लखमापूर, सारदे, अंबासन आदी गावांसह परिसरात या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. कांदा, मका, गहू, द्राक्ष व डाळिंब या प्रमुख पिकांना सर्वाधिक फटका बसला असून अनेक ठिकाणी उभी पिके अक्षरशः जमिनीवर कोसळली आहेत.

गारपिटीमुळे द्राक्षबागांमधील घड तुटून पडले असून डाळिंब बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. कांद्याचे पीक पाण्यात भिजून सडण्याच्या मार्गावर असून साठवलेला कांदाही खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मक्याची कणसे व गव्हाची पिके जमिनीवर पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अनेकांनी कर्ज काढून मोठ्या मेहनतीने पिके उभी केली होती; मात्र काही तासांच्या पावसाने व गारपिटीने त्यांचे संपूर्ण नुकसान झाले. त्यामुळे उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व कर्जफेड यांसारखे गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहेत. दरम्यान, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून महसूल व कृषी विभागाच्या पथकांकडून लवकरच पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरीव मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती दीपिका चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!