नाशिक (प्रतिनिधी): प्रभाग क्र. २८ मधील प्रसन्न नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी तसेच काही भागात पूर्णपणे पाणी न पोहोचणे अशा समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर संतप्त नागरिकांनी नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांच्याशी संपर्क साधून या प्रश्नात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत फडोळ यांनी तत्काळ पाणीपुरवठ्याच्या वेळेत प्रसन्न नगर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. पाणी येण्याच्या वेळेतही अनेक घरांमध्ये अत्यल्प दाबाने पाणी येत असल्याचे तसेच काही भागात पाणी अजिबात पोहोचत नसल्याचे वास्तव त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी शरदभाऊ फडोळ यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याच्या वेळेतच बोलावण्यात आले होते, जेणेकरून प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव त्यांना होऊ शकेल. यावेळी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्या. पाहणीदरम्यान असे निदर्शनास आले की, प्रसन्न नगर परिसरात सुरुवातीला लोकवस्ती अत्यल्प होती. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. तरीदेखील पाणीपुरवठा अजूनही जुन्या व कमी क्षमतेच्या पाईपलाईनवर अवलंबून आहे. परिणामी, वाढलेल्या लोकसंख्येमुळे पाण्याचा ताण वाढून पुरवठा अपुरा पडत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक शरदभाऊ फडोळ यांनी अधिकाऱ्यांना या ठिकाणी नवीन व अधिक क्षमतेची पाण्याची पाईपलाईन टाकणे अत्यावश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच, नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी तातडीने नियोजन करून काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. नगरसेवकांच्या सूचनेनंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रसन्न नगर परिसरात लवकरच नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले. यासाठी आवश्यक तांत्रिक तपासणी व अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, नगरसेवकांनी तातडीने लक्ष घालून प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणीसाठी भाग पाडल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी “दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागेल” अशी आशा व्यक्त केली. नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रसन्न नगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांना नियमित व पुरेसा पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
