ग्रामीण अंबासनमध्ये विज्ञानाचा स्फोट; नूतन विद्यालयात १०५ मॉडेल्सनी थक्क केले मान्यवर

ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, आरोग्य, आधुनिक तंत्रज्ञान व दैनंदिन जीवनाशी निगडित १०५ वैज्ञानिक मॉडेल्स आणि ७५ विज्ञानाधारित रांगोळ्या या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले. ग्रामीण विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांनी शहरी पातळीवरील प्रदर्शनांनाही मागे टाकावे, असा ठाम विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

प्रदर्शनाचे उद्घाटन मविप्र संस्थेचे सरचिटणीस दिलीप (भावसा) दळवी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे स्पष्ट करत विद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले. संस्थेचे संचालक आर. के. बच्छाव यांनी ग्रामीण भागात इतक्या दर्जेदार विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत विद्यालयाचे अभिनंदन केले.

मुख्याध्यापक व्ही. एन. पाडवी यांनी प्रास्ताविकातून विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षणशक्ती व समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यावर भर दिला. मान्यवरांनी प्रत्येक मॉडेलची पाहणी करून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांमागील संकल्पना व सामाजिक उपयुक्तता आत्मविश्वासाने मांडली.

यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान हस्तलिखिताचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष नंदू कोर यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

विज्ञान शिक्षक श्रीमती संगीता आहेर, दीपक दाभाडे, सतीश गरुड व जयकुमार लाडे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक हेमंत दाणी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

➡️ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक झेप, नवकल्पनांची ताकद आणि शिक्षणातील गुणवत्ता यांचे प्रभावी दर्शन घडवणारे हे विज्ञान प्रदर्शन ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!